नाशिक – नाशिक येथील सोशल नेटवर्कींग फोरम ही संस्था कोविड सुरू झाल्यापासून ग्रामिण आणि आदिवासी भागातील हजारो लोकांना आरोग्य आणि इतर सुविधा पुरवत आहे. कोविडच्या दुस-या लाटेतही ग्रामीण भागातील दहा हजार आरोग्य सेवकांना वैद्यकिय सूरक्षा साहित्य पुरवण्याचा निर्णय एसएनएफने घेतला आहे. यासंदर्भातील मदतीसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत देश विदेशातून मदत येत आहे. आनंदाची बाब म्हणजे आता सामाजिक संस्था आणि कंपन्याही या मोहिमेत योगदान देण्यास येत आहेत.
नाशिकची प्रसिद्ध शैक्षणिक संस्था रचना ट्रस्ट आणि जेनीक्स इंजिनियरींग प्रा. लि. यांनी सुरक्षा साहित्यासाठी चार लाख रुपयांची मदत केली आहे. फोरमने केलेले आवाहन वाचून रचना ट्रस्टचे सदस्य डाॅ. आर्चीस नेर्लीकर, डाॅ. हेमंत कोतवाल, सिईओ नरेंद्र बर्वे तसेच जेनीक्स इंजिनीयरींगचे सौ. ऊमा आणि श्री निखील दिवाकर यांनी त्वरीत प्रतिसाद देवून एसएनएफच्या कामाला मोठे बळ दिले. या निधीतून जवळपास 3000 आरोग्य सेवकांच्या सूरक्षेची जबाबदारी ऊचलली जाणार असून त्यातून फेस शिल्डस, मास्क्स, सॅनीटायझर, वेपरायझर्स, पिपीई किट्स आणि इतर आवश्यक साहित्य पुरवण्यास सुरूवात झाली आहे.
सध्या हे साहित्य पेठ, सुरगाणा, त्रंबकेश्वर, दिंडोरी तालुक्यातील आशा वर्कर्स, मदतनीस आणि कोविड सेंटर्सवरील कर्मचार्यांपर्यंत पोहोचवण्याच्या नियोजनासाठी अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्यासह डाॅ. पंकज भदाणे, प्रशांत बच्छाव, रामदास शिंदे, संदिप बत्तासे, जयदिप गायकवाड, डाॅ. निलेश पाटिल, विजय भरसट, संदिप डगळे, रामदास दिवे आणि एसएनएफची टिम अहोरात्र काम करत आहे. ग्रामिण आरोग्य सेवकांसाठी मोलाची मदत करणा-या सोशल नेटवर्कींग फोरम, रचना ट्रस्ट आणि जेनीक्स इंजिनियरींग प्रा. लि. यांच्या प्रयत्नांचे सर्व तालुका अधिका-यासह ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.
सुविधा उपलब्ध करून दिल्याचे समाधान
दुर्गम आदिवासी भागातील लोकांची परिस्थिती बिकट असल्याने तेथील आरोग्य सेवकांच्या सूरक्षेसाठी आणि पेशंटसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्याचे समाधान आहे_
डाॅ. हेमंत कोतवाल, रचना ट्रस्ट
१० हजार आरोग्य सेवकापर्यंत कोविड सुरक्षा साहित्य पोहचवणार