मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महिलांना शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात एसएनडीटी विद्यापीठाचा मोठा वाटा आहे. शंभर वर्षांहून अधिक काळ झालेल्या एसएनडीटी विद्यापीठाचे केंद्र येत्या जूनपासून चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे सुरु करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याविषयी सातत्याने पाठपुरावा केला होता. येणाऱ्या शैक्षणिक वर्षांपासून येथे रोजगारभिमुख आणि कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरु करण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. श्री.पाटील यांच्या निवासस्थानी यासंदर्भात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
एस.एन.डी.टी.अर्थात श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचे केंद्र चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे सुरु करण्यासंदर्भात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा. उज्ज्वला चक्रदेव, उच्च व तंत्रशिक्षण संचालक धनराज माने यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
श्री. मुनगंटीवार म्हणाले की, एसएनडीटी विद्यापीठाचा आतापर्यंत 7 राज्यांमध्ये विस्तार झालेला आहे. वेगवेगळे शैक्षणिक, रोजगारभिमुख आणि कौशल्याधारित अभ्यासक्रमांना आज मागणी आहे. त्यामुळे चंद्रपूर आणि येथील परिसरातील विद्यार्थीनींना आवश्यक असणारे साधारण 10 अभ्यासक्रम या विद्यापीठातून शिकविण्यात येतील. एसएनडीटी विद्यापीठाचे केंद्र बल्लारपूर येथे सुरु करण्यासाठी आवश्यक असणारी जागेची पाहणी, साधनसामुग्री तसेच केंद्र सुरु झाल्यानंतर आवश्यक असणारे मनुष्यबळ, शिक्षित प्राध्यापक याबाबतचा आढावा प्रत्यक्ष घेण्यात येईल.
नवीन शैक्षणिक वर्ष जूनपासून सुरु होत असल्याने प्राथमिक टप्प्यात चंद्रपूर येथे असलेल्या अत्याधुनिक दोन शाळांमध्ये अभ्यासक्रम सुरु करण्यात येतील. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि एसएनडीटी विद्यापीठाने पार केलेली शताब्दी याचा मेळ घालून काही नवीन उपक्रमही विद्यापीठामार्फत सुरु करण्यावर भर देण्यात येईल, असेही श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
श्री. पाटील म्हणाले की, चंद्रपूर येथील बल्लारपूर येथे एसएनडीटी केंद्र सुरु करण्यासाठी आवश्यक निधीबाबत सविस्तर प्रस्ताव करावा. तसेच सध्या पहिल्या टप्प्यात आवश्यक निधी सामाजिक उत्तरदायित्व निधी, जिल्हा नियोजन निधी याव्यतिरिक्त कसा उभा करता येईल याबाबतही सविस्तर प्रस्ताव उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे तातडीने सादर करण्यात यावा. आवश्यक पदभरती होईपर्यंत करार पद्धतीवर नेमणुका करुन काम सुरु करण्यात यावे. स्थानिक रहिवाशांना भरतीमध्ये प्राधान्य देण्यात यावे. दुर्गम भागातील हे केंद्र महिलांना आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास श्री.पाटील यांनी व्यक्त केला.
SNDT University Sub Centre Will Start in This City