येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– जगदंबा शिक्षण संस्थेच्या संतोष एन. दराडे (एस.एन.डी.) पॉलिटेक्निकमध्ये विद्यार्थ्यासाठी कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आले. बजाज ऑटो लिमिटेड पुणे या कंपनीने कॅम्पस मुलाखतीतीतून ७३ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड केली आहे.
पॉलीटेक्निकमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकत असताना शेवटच्या वर्षातच नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत.विशेष म्हणजे महाविद्यालयामार्फत विविध नामांकित कंपन्यांना या ठिकाणी निमंत्रित करून विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाते.या आगळ्यावेगळ्या उपलब्धतेमुळे विद्यार्थ्यांसह पालकातून देखील समाधान व्यक्त होत आहे.विशेष म्हणजे वर्षागणित नामांकित कंपन्या या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मुलाखतीसाठी येऊ लागल्या आहेत.आतापर्यंत पूल कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून या वर्षी ४०० हून अधिक विद्यार्थ्यांना विवध आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.
बजाज ऑटो लिमिटेड पुणे या कंपनीचे असिस्टंट मॅनेजर रवींद्र वाघचौरे यांच्या उपस्थितीत टाइमपास मुलाखती झाल्या. पॉलिटेक्निकच्या इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल विभागातील १८३ विध्यार्थांनी सहभाग नोंदविला. यात विध्यार्थांची टेक्निकल चाचणी व मुलाखती घेण्यात आल्या. सदर कॅम्पस मुलाखती मध्ये ७३ विध्यार्थांची निवड करण्यात आली असून निवड झालेल्या विद्यार्थ्याना वार्षिक २.१० लाखाचे पॅकेज मिळणार असल्याची माहिती प्राचार्य उत्तम जाधव यांनी दिली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ऑफर लेटर्स देण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अंतिम वर्षाची परीक्षा पूर्ण होण्या आधीच चांगल्या कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळाल्याने विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले.
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष किशोर दराडे,सचिव कुणाल दराडे,संचालक रुपेश दराडे,प्रशासकीय अधिकारी समाधान झाल्टे,प्राचार्य उत्तम जाधव यांनी अभिनंदन केले.