देवळा : चैत्र महिन्यातील असाह्य उन्हाबरोबरच आल्हाददायक हवेची झुळूक, निसर्गात वसंतोत्सवाची रंगीबेरंगी उधळण, पृथ्वीवरील सृष्टीचे चक्र अबाधित राखण्यासाठी पुनर्निर्मिती करणारा ऋतुराज प्राण्यांमधील भावभावना जागृत करतो आणि भावविभोर झालेल्या पशुपक्षांच्या प्रणयलीलांचे मनोहारी दृश्य जागोजागी दृष्टीचे पारणे फेडते… असाच अनुभव देवळा तालुक्यातील पिंपळगाव (वा.) येथील नागरिक अनुभवत आहेत.
येथील खडकतळे रोडलगत रहिवासी असलेले प्राथमिक शिक्षक केशव खैरणार यांच्या घराच्या पाठीमागे मंगळवारी सकाळीच सात ते आठ फूट लांबीचे धामण जातीचे नर आणि मादी सर्प प्रणयक्रीडा करत असल्याचे दिसले. त्यांनी तो दुर्मिळ व नयनमनोहर क्षण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला व शेजाऱ्यांना याबाबत माहिती दिली. ते दृश्य बघण्यासाठी गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे…
सर्प शेतकऱ्यांचा मित्र
वसंत ऋतूत पशुपक्षी पुनरुत्पादनासाठी एकत्र येतात ही निसर्गाची किमया आहे. सरपटणारे प्राणी अशा वातावरणात प्रणय क्रीडा करण्यासाठी मोकळ्या जागेत येत असतात. तरी कुणीही त्यांना मारू नये. सर्प शेतकऱ्यांचा मित्र आहे. उंदीर, घुशीसारख्या उपद्रवी प्राण्यांना खाऊन त्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. केशव खैरणार, प्राथमिक शिक्षक, पिंपळगाव (वा.)
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!