इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तर प्रदेशातील भवानियापूर सध्या विशेष चर्चेत आले आहे. गावामध्ये तीन दिवसांत तीन भावांना सर्पदंश झाला आहे. यामध्ये दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला असून चुलत भावाची प्रकृती चिंताजनक आहे. प्रथम मोठ्या भावाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. त्याच्या चितेची आगही शांत होत नाही तोच लहान भावाचाही सर्पदंशाने मृत्यू झाला. व्हरांड्यात झोपलेल्या भावालाही सर्पदंश झाला आहे. त्यांची प्रकृतीही चिंताजनक आहे. लालिया पोलीस स्टेशन हद्दीतील भवानियापूर गावात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे देशभरातच चिंता व्यक्त होत आहे.
सोमवारी रात्रीच्या सुमारास अरविंद मिश्रा या मोठ्या भावाला सर्पदंश झाला. त्याचा बहराइच जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. भावाच्या अंत्यसंस्कारानंतर २५ वर्षीय धाकटा भाऊ गोविंद मिश्रा हा बुधवारी रात्री ९ वाजता जेवण करून झोपी गेला. त्याच्या शेजारीच त्याची पत्नीही झोपली होती. गोविंदचा चुलत भाऊ चंद्रशेखर (वय २२, रा. सिकंदरबोझी) हा देखील व्हरांड्यात झोपला होता. गोविंद आणि चंद्रशेखर या दोघांनाही झोपेत साप चावला. मात्र झोपेत थकवा आल्याने त्यांना सर्पदंश कळाला नाही. रात्री एक वाजता दोघांची प्रकृती खालावली. दोघांच्या पोटात दुखू लागले. आणि त्यांना अंधुक दिसू लागले.
गोविंद आणि चंद्रशेखर यांना श्रावस्तीच्या लक्ष्मणपूर बाजारपेठेत असलेल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर गोविंदला सिरसिया येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने डॉक्टरांनी त्यांना बहराइच येथे पाठवले. सकाळी दहा वाजता गोविंदचा मृत्यू झाला. लक्ष्मणपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या चंद्रशेखरच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने डॉक्टरांनीही त्यांना बहराइचच्या जिल्हा रुग्णालयात पाठवले आहे.
शिवपुरा आरोग्य केंद्राचे अधीक्षक डॉ. प्रणव पांडे यांनी सांगितले की, गोविंदला अत्यंत विषारी सापाने दंश केला आहे. त्याच्या पायाच्या अंगठ्यावर सर्पदंशाच्या खुणा आढळल्या आहेत. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशील कुमार, एसीएमओ डॉ. ए.के. सिंघल, पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक लालिया संतोष कुमार तिवारी आदींनी घटनेचा आढावा घेतला.
तीन दिवसांत दोन तरुण मुलगे गमावलेल्या वृद्ध आई आणि वडिलांची अवस्था बिकट आहे. गोविंद आणि अरविंदच्या बायका रडत आहेत. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशील कुमार आल्यावर वृद्ध आई त्यांना बिलगून रडू लागली. लालिया पोलीस ठाण्याचे पोलीस पथकाने आई-वडिलांना धीर दिला आहे. वडील साधुराम यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर कुटुंबियांना शासनाकडून मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रणव पांडे यांनी सांगितले की, गावाच्या परिसरात विषारी प्रजातीचे साप आहेत. पावसाळ्यामुळे साप त्यांच्या सुरक्षेसाठी लोकांच्या घरात आसरा घेतात. या प्रजातीच्या सापाला भिंतीवर चढण्याची सवय आहे. तो कॉटवरही चढतो. झोपलेल्या व्यक्तीच्या थोड्याशा हालचालीवर चावायला चुकत नाही. मच्छरदाणी लावून झोपल्याने संरक्षण मिळू शकते. गावकऱ्यांनी मच्छरदाणीचा अवश्य वापर करावा. आरोग्य केंद्रात सर्पदंश विरोधी इंजेक्शन उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. ऑक्सिजनही उपलब्ध आहे. सर्पदंश झाल्यानंतर तत्काळ रूग्णालयात आणल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
Snake Bite two brothers death one brother serious
Uttar Pradesh Bhavaniyapur