नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्लोवेनिया येथे झालेल्या योनेक्स सोव्हेनीया आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या स्मित तोषणिवालने सुंदर खेळाचे प्रदर्शन करून या स्पर्धेत रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत तिने महिला एकेरीमध्ये भारताचे प्रतीनिधीत्व केले.
या स्पर्धेत पुरुष एकेरी. पुरुष दुहेरी, महिला एकेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी अश्या पाच गटांचा समावेश होता. या स्पर्धेत महिला एकेरीमध्ये सहावे मानांकन मिळालेल्या स्मित तोष्णीवालने पहिल्या राऊंडमध्ये इंडोनेशियाच्या तर्या फराहलाहचा २१-०९, २१-१९ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून आपली विजयी मालिका सुरू केली. त्यानंतर अत्यंत चुरशीच्या झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात स्मितने युक्रेनच्या ऑरीना मारुस्कयक हीचा २२-२४, २१-१० आणि २१-१९ असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. या सामन्यात स्मितला पहील्या सेटमध्ये २४-२२ असा पराभव पत्करावा लागला होता. परंतू त्यानंतर स्मितने जोमाने खेळ करून दूसरा सेट २१-१० असा जिंकून १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर तीसऱ्या निर्णायक सेटमध्ये स्मितने सय्यमाने खेळ करून हा सेट २१-१९ असा जिंकून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले.
त्यानंतर खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या सांमन्यातही स्मितने आपली हीच विजयी लय कायम राखत इंडोनेशियाच्या मुटियारा आयू पुसपित्रासरी हीला २१-१७ २१-०७ असे सहज पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. स्मितची अंतिम लढत या स्पर्धेत आठवे मानांकन असलेल्या चायना तायपेच्या लीन हसिंग-ती हीच्याविरुद्ध झाली. या अंतिम लढतीतही स्मितने सुंदर खेळ करून पहिल्या सेटमध्ये ८-६ अशी दोन गुणांची आघाडी मिळवून चांगली सुरवात केली.
परंतु त्यानंतर लीन हसिंग-ती हीने जोमाने खेळ करून ही आघाडी मोडून काढत १८-१२ अशी तब्बल सहा गुणांची आघाडी घेत हा सेट २१-१५ असा जिंकून १-० अशी महत्वाची आघाडी मिळविली. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये स्मितने काही चांगले प्रयत्न केले. परंतु तिला या सेटमध्येही २१-१४ अश्या फरकाने पराभव पत्करावा लागला. परंतु या मानाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत स्मितने सुंदर खेळ करून रौप्य पदक पटकावून आपण भविष्यात भारताला सुवर्णपदक मिळवून देवू असा विश्वास व्यक्त केला. यानंतर लगेचच दिनांक २६ ते २९ मे, २०२२ दरम्यान ऑस्ट्रीया येथे आयोजित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत स्मित भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
स्मितने याआधी जानेवारी, २०२२ मध्ये सईद मोदी इंटरनॅशनल स्पर्धेत आणि त्याआधी २०२१ ला बांगला देशात झालेल्या बांगला देश इंटरनॅशनल चॅलेंज स्पर्धेत उपउपांत्य फेरीपर्यन्त मजल मारली होती. तर सन २०२० मध्ये आयोजित खेलो इंडिया स्पर्धेत आणि वारिष्ट गटाच्या अखिल भारतीय स्पर्धामध्ये स्मितने चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला होता. तसेच स्मितने विविध गटाच्या १२ राष्ट्रीय स्पर्धामध्ये सुवर्ण. रौप्य आणि कास्य पदके मिळविली आहेत.
स्मितने नाशिकमध्ये अनेक वर्षे सराव करून राष्ट्रीय स्पर्धामध्ये आपले स्थान पक्के केले आहे. सध्या ती हैद्राबाद येथे चेतन आनंद यांच्या बॅडमिंटन अकादमी मध्ये गेल्या दोन वर्षापासून नियमीत सराव करत आहे.