नाशिक – गेल्या दोन महिन्यांत बालकांवरील मोफत हृदयउपचार आरोग्य शिबिरास भरघोस प्रतिसाद मिळाला. तब्बल ८२ बालकांवर यशस्वी हृदयउपचार करण्यात आले. ठाणे, पालघर जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांचा या आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद लाभला. बालकांच्या हृदयरोगाबाबत झालेली जनजागृती आणि सर्वसामान्य रुग्णांच्या मागणीमुळे या महिन्यात पुन्हा एकदा या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या महिन्यात तब्बल दिवस बालकांवर हृदयउपचार करण्यात येणार आहेत.
२६ ऑक्टोंबरपासून या शिबिरास सुरुवात होणार असून जास्तीत जास्त रुग्णांनी संपर्क साधावा असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनाकडून करण्यात आले आहे. एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये गंभीर आजारांवरील उपचार होत आहेत. गंभीर आजारांवरील उपचार आणि शस्त्रक्रिया यासाठी नागरिकांना पूर्णपणे निशुल्क, गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधेचा लाभ उपलब्ध करून देणाऱ्या प्रधानमंत्री जनआरोग्य आणि महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य या दोन्ही योजना उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या एसएमबीटी चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ आतापर्यंत हजारो रुग्णांना झाला आहे.
गंभीर आजारांवरील उपचार, शस्त्रक्रिया यासाठी मोठा खर्च येतो. तो सर्वसामान्य, आर्थिकरित्या दुर्बल रुग्णांच्या आवाक्याबाहेर असल्याने अनेक जण उपचार घेणे, शस्त्रक्रिया करुन घेणे टाळतात. वेळेत आणि योग्य उपचार न झाल्याने अनेकांचे जीवही जातात. कुठल्याही रुग्णाची उपचारांअभावी परवड होऊ नये, यासाठी सरकारने जीवनदायी योजना आणल्या आहेत.
या योजनांचा रुग्णांना लाभ मिळावा त्याकरिता परिपूर्ण वैद्यकीय सेवा, सुविधा असलेली राज्यातील ठराविक रुग्णालये या दोन्ही योजनेशी संलग्न आहेत. योजना सुरू झाल्यापासूनच उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे एसएमबीटी चॅरिटेबल हॉस्पिटल या दोन्ही योजनांशी जोडले गेलेले आहे. त्यामुळे या महिन्यात बुधवार (दि २६) ते सोमवार (दि ३१) दरम्यान बालकांवर मोफत हृदय उपचार करण्यात येणार आहेत. आपल्या बालकांना जर हृदयाशी संबंधित काही लक्षणे असतील तर त्यांनी तात्काळ हॉस्पिटलशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
हृदय उपचारांचा विक्रम
गेल्या दोन महिन्यात अवघ्या चार दिवसांत ८२ बालकांवर यशस्वी हृदय उपचार करण्यात आले. येथे येणाऱ्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण उत्तर महाराष्ट्रातील होते. यामध्ये शिरपूर, नंदुरबार, धुळे, भुसावळ, मालेगाव, सटाणा, नाशिक येथील तर ठाणे आणि पालघरमधील भिवंडी, पालघर व शहापूर येथील रुग्णांचा समावेश होता.
स्वतंत्र मार्गदर्शन कक्ष
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ पिवळे आणि केशरी शिधापत्रिका धारकांबरोबरच सध्या सफेद शिधापित्रका धारकांना देखील मिळतो आहे. प्रधानमंत्री जनआरोग्य आणि महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य या दोन्हीयोजनांच्या संदर्भाने रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष अशा स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. येथील प्रशिक्षित कर्मचारी योजनेत सामाविष्ट असलेल्या आजारांवरील उपचार आणि शस्त्रक्रिया या संदर्भाने योग्य मार्गदर्शन करतात. १३ जणांची टीम येथे कार्यरत आहे. येथे येणाऱ्या प्रत्येकाला योग्य मार्गदर्शन मिळते.