नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- क्षेत्र कुठलेही असो सराव, सातत्य आणि मेहनत करण्याची ताकद असेल तर नक्कीच कितीही अवघड असलेल्या यशाला गवसणी घालता येते असे प्रतिपादन भारताचे माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यांनी केले. ते एसएमबीटी क्रिकेट कार्निवलच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी बोलत होते. एसएमबीटी कॅम्पसमधील अल्हाददायक परीसर आणि मुलांचा उत्साह पाहून भारावलो असल्याचेदेखील हरभजन याप्रसंगी ते म्हणाले. यावेळी एसएमबीटी सेवाभावी संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ हर्षल तांबे, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शाह यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या शैक्षणिक संकूलात ‘एसएमबीटी फेस्ट २०२५’ या वार्षिकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याआधी २७ तारखेपासून क्रिकेट कार्निवल आयोजित करण्यात आला आहे. फेस्टच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारच्या खेळांच्या स्पर्धांनी या फेस्टला वेगळीच रंगत आणली आहे. फेस्टचे आयोजन शनिवार दिनांक ५ मार्चपासून ८ मार्चपर्यंत असणार आहे. यादरम्यान हॅपी स्ट्रीट, साहित्य, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट संचलित एसएमबीटी आयएमएस अॅण्ड आरसी मेडिकल कॉलेज, एसएमबीटी आयुर्वेद कॉलेज, एसएमबीटी कॉलेज ऑफ फार्मसी, डेन्टल कॉलेज संगमनेर, एसएमबीटी कॉलेज ऑफ नर्सिंग, एसएमबीटी हॉस्पिटल यांचा संयुक्त वार्षिकोत्सव एसएमबीटी ट्रस्टच्या नंदी हिल्स येथील कॅम्पसमध्ये दरवर्षी मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. गेल्या वर्षी अजिंक्य रहाणे यांच्या हस्ते क्रिकेट कार्निवलचे उद्घाटन झाले होते. यानंतर यंदा कोण उद्घाटनासाठी येणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली असताना भज्जी अर्थात हरभजन सिंग येणार समजताच विद्यार्थ्यांसह सबंध शिक्षक शिक्षकेतर स्टाफकडून जल्लोषाचे वातावरण निर्माण करण्यात आले होते.
सुरुवातील कॉफी विथ भज्जी हा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाला हरभजनने हजेरी लावली. यावेळी मनसोक्त गप्पा विद्यार्थी आणि हरभजनमध्ये रंगलेल्या दिसून आल्या. यानंतर एसएमबीटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथील क्रिकेट मैदानावर क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी, तब्बल ३२ क्रिकेट टीमच्या सदस्यांच्या आणि जनसमुदायाच्या उपस्थित हरभजनने मैदानावर फेरफटका मारला.
हिरवा शालू परिधान केलेले मैदान पाहून हरभजनने सुरुवातीला बॅट हातात घेत उत्तुंग षटकारांची आतषबाजी केली. यानंतर स्वत:च्या अनोख्या शैलीत गोलंदाजीदेखील केली. यावेळी मैदानाबाहेर जमलेल्या प्रेक्षकांनी भज्जी, भज्जू पा आणि द टर्बेनेटर अशा आवाजाने एकच जल्लोष केला. आजवर अनेक कार्यक्रमांना मी गेलो परंतु सर्वाधिक आनंद मला आज ग्रामीण भागातील सर्वात सुंदर अशा मैदानात झाल्याचे हरभजन म्हणाले. यामुळे आपल्या टीममध्ये एकी तर वाढेलच शिवाय खेळाची आवड असलेल्या प्रत्येकाला मुक्त व्यासपीठ यानिमित्ताने मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.
एकीकडे लाखो रुग्णांवर उपचार करत असलेला हा कॅम्पस येथे काम करणाऱ्या प्रत्येकासाठी किती वेगवेगळे उपक्रम करू शकतो हे वाखाणण्याजोगे असल्याचे ते म्हणाले. यानंतर मुंबई की चेन्नई आयपीएलमधील कोणती टीम आवडते? याविषयी विचारले असता हरभजनने मुंबईबाबत विशेष प्रेम असल्याचे बोलून दाखवले. तसेच धोनी आणि रोहित शर्मा याबाबत विशेष प्रेम असल्याचे म्हणत सौरव गांगुलीच्या कॅप्टन्सीमध्ये खेळायला अवश्य आवडेल असेही ते म्हणाले. क्रिकेट कार्निव्हलसोबतच टेबल टेनिस, महिलांसाठी क्रिकेट, व्हॉलीबॉल, कॅरम, फुटबॉल बास्केटबॉल, चेसचाही आनंद विद्यार्थ्यांना याप्रसंगी घेता आला.
यावेळी संस्थेचे बोर्ड मेंबर श्रीराम कुऱ्हे, अधिष्ठाता डॉ मीनल मोहगावकर, प्राचार्य डॉ. प्रदीप भाबड, प्राचार्य डॉ. अशोक पाटील, अधिष्ठाता डॉ. किरण जगताप, प्राचार्य डॉ योगेश उशीर, प्राचार्या डॉ कविता मातेरे, सेन्ट्रल मॅनेजमेंटचे हितेश माधवानी, अमित कलंत्री, डॉ महेश गाभणे, मिलिंद खेडेकर यांच्यासह अनेक मान्यवर व मोठ्या संख्येने शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
क्रिकेट कार्निव्हल असते दरवर्षी आकर्षण
या सामन्यांसाठी तब्बल ३२ वेगवेगळ्या टीम आहे. प्रत्येक टीममध्ये १५-१७ खेळाडू असून तब्बल एसएमबीटी परिवारातील ८०० पेक्षा अधिक सदस्यांचा यात सक्रीय सहभाग आहे. दरवर्षी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी या सामन्यांचे आयोजन केले जाते. आचार विचारांची देवाण-घेवाण, टीम बिल्डींग यानिमित्ताने व्हावी असा उद्देश असल्याचे डॉ हर्षल तांबे सांगतात.
डे-नाईट सामन्यांची झलक
क्रिकेट म्हटलं की सर्वांच्याच आवडीचा खेळ आहे. गेल्या तीन वर्षांपासून एसएमबीटी सेवाभावी संस्थेच्या शैक्षिणिक संकुलातील क्रिकेट सामने डे-नाईट स्वरुपात होत आहेत. दिवस-रात्र सामने खेळवली जात असल्यामुळे जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला आहे.
एनडीसीए आणि एसएमबीटी एकत्र काम करणार
हे मैदान उच्च दर्जाचे आहे, उत्तर महाराष्ट्रातील खूप चांगली विकेट असलेले मैदान आहे. ग्रामीण भागातील क्रिकेट टॅलेंट सर्च करण्यासाठी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन (एनडीसीए) आणि एसएमबीटी सोबत काम करणार आहे. भविष्यातील क्रिकेटशी निगडीत उपक्रम राबविण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे.
विनोद शाह, अध्यक्ष, एनडीसीए