नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -आर्थिक परिस्थितीशी दोन हात करताना २६ वर्षीय उच्चशिक्षित तरुणाची किडनी निकामी झाली आणि कुटुंबावर दु;खाचा डोंगर कोसळला. मोठी संकटे आली की अतिशय खंबीरपणे उभे राहणारे वडील सर्वांनाच आठवतात. असाच एक प्रसंग नुकताच एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये घडला. अमरावती जिल्ह्यातील उच्चशिक्षित असलेल्या सोमेशचे आयुष्य सुंदर व्हावे यासाठी त्याच्या वडिलांनी किडनीदान करून त्यास नवा जन्म दिला. मुलगा आणि वडील दोघेही सुखरूप असून नुकताच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. संपूर्ण किडनी ट्रान्सप्लांट (मूत्रपिंड प्रत्यारोपण) पूर्णपणे मोफत करण्यात आले. यामुळे हालाखीची परिस्थिती असलेल्या कुटुंबाला दिलासा मिळाला.
राज्यात १०-१५ जिल्ह्यांत किडनी ट्रान्सप्लांट केले जाते तसेच ५ ते १० लाखांपर्यंत खर्च येतो. हा खर्च सर्वसामान्य रुग्णांना परवडणारा नाही, हे एसएमबीटी हॉस्पिटलच्या लक्षात आल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना प्रभावीपणे राबवत जास्तीत जास्त रुग्णांना जीवनदान देण्यासाठी हॉस्पिटल प्रयत्न करत आहे. हॉस्पिटलमध्ये मोफत किडनी ट्रान्सप्लांटची सुरुवात झाले असून जास्तीत जास्त रुग्णांनी मोफत उपचाराचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सचिन बोरसे यांनी केले आहे.
किडनी ट्रान्सप्लांट झालेला सोमेश बोंडे नामक रुग्ण उच्चशिक्षित आहे. गेल्या दीड ते दोन वर्षांपूर्वी किडनीचा त्रास असल्याचे निदान त्याचे झाले होते. त्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी उपचार घेतले, मात्र त्या उपचारांचा खूप काही फरक पडला नाही. दरम्यान, किडनी निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगत डायलिसीस करण्याचा सल्ला दिला. एवढया कमी वयात डायलिसीस करणे हा कुटुंबासाठी मोठा धक्का होता. यादरम्यान त्यांना एसएमबीटी हॉस्पीटलमध्ये उपचार घेण्याचा सल्ला दिला.
प्राथमिक तपासण्या झाल्यानंतर डॉक्टरांनी सर्व नातेवाईकांना किडनी ट्रान्सप्लांटबाबत सखोल माहिती दिली. शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाचे नातेवाईक आणि किडनीदात्याचे नातेवाईक यांची संमती घेण्यात आली. यानंतर किडनी दाता आणि रुग्ण यांच्याशी चर्चा करत किडनी ट्रान्सप्लांट करण्याची तारीख आणि वेळ निश्चित करण्यात आली. त्याआधी सोमेश व त्यांच्या वडिलांचे शरीर शस्त्रक्रियेसाठी अनुकूल आहे किंवा नाही या हेतूने तपासण्या करण्यात आल्या. दरम्यान, मागे न हटता तत्काळ ट्रान्सप्लांट करण्यासाठी नातेवाईकांनी होकार दर्शिवल्यानंतर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली.
एखाद्या हॉस्पिटलमध्ये किडनी ट्रान्सप्लांट करण्याची सुविधा उपलब्ध करण्यासाठी येथे उच्चशिक्षित आणि अनुभवी डॉक्टर्स किडनी ट्रान्सप्लांट तज्ञांसह किडनी ट्रान्सप्लांटसाठी आवश्यक असलेले भूलतज्ञ, ऑपरेशन करण्यासाठी अत्याधुनिक साधनसामुग्री, सुसज्ज मोड्युलर ऑपरेशन थियेटर व ट्रान्सप्लांट आयसोलेशन विंग उपलब्ध आहे. तसेच शस्रक्रिया झाल्यानंतर अनुभवी आणि प्रशिक्षित नर्सिंग केअर आवश्यक असते तीदेखील याठिकाणी उपलब्ध आहे. विशेष म्हणजे रुग्ण जितक्या दिवस याठिकाणी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतो त्याकाळात रुग्णाचा आहार विहार तसेच त्यांचे समुपदेशनदेखील केले जात असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ मीनल मोहगावकर यांनी दिली.
किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया एसएमबीटीच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या एका टीमने पूर्ण केली. नेफ्रॉलॉजिस्ट म्हणजेच किडनी विकार व प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ अमोलकुमार पाटील, डॉ नयनेश चव्हाण, मूत्रविकार शस्रक्रिया तज्ञ डॉ. नरसिंग माने, क्रिटिकल केअरच्या डॉ रुचिरा खासने, भूलतज्ज्ञ डॉ योगेश सूर्यवंशी, डॉ मीरा पांडे आणि इतर प्रशिक्षित सहाय्यकांच्या टीमने ही शस्त्रक्रिया पूर्ण केली. मोफत किडनी ट्रान्सप्लांट करण्यासाठी ट्रान्सप्लांट समन्वयक अशोक राऊत यांच्याशी किंवा 93713 93713 या मोफत हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.
एसएमबीटी माझे दुसरे घर
किडनी ट्रान्सप्लांटसाठी एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये आलो तेव्हापासून हे हॉस्पिटल आहे असे मला वाटलेच नाही; अगदी खेळीमेळीत माझे उपचार झाले. नियमित कुणी ना कुणी भेटायला येणार तब्बेतीची विचारपूस करणार आपला आत्मविश्वास वाढवणार. त्यामुळे आज बरा होऊन जरी घरी परतत असलो तरी हॉस्पिटलसोबत नातं हे कायमच असणार आहे.
-सोमेश बोंडे, किडनी प्रत्यारोपण झालेला रुग्ण
किडनी कोण दान शकतो?
वयवर्ष १८ ते ५५ वयोगटातील दात्याची किडनी देता किंवा घेता येते. स्त्री आणि पुरुष दोघेही एकमेकांना किडनी देऊ शकता. जुळे भाऊ-बहीण हे आदर्श किडनीदाते मानले जातात. आई-वडील, भाऊ-बहिण किडनी दान करण्यासाठी निवडले जातात. जर या किडनी दात्यांकडून किडनी मिळू शकली नाही, तर इतर कुटुंबीयातील नातलगाकडून किडनी घेता येते.
-डॉ. नरसिंग माने, मूत्रविकार तज्ञ, एसएमबीटी हॉस्पिटल
रुग्णाची डायलिसीसची गरज संपली
किडनी आणि डायलिस तज्ञ म्हणून काही दिवसांपूर्वी रुजू झाल्यापासून किडनी ट्रान्सप्लांट करण्याचे स्वप्न होते. आज हे स्वप्न साकार झाले आहे. पहिलाच किडनी ट्रान्सप्लांट झालेला रुग्ण हा क्रीयाटीन लेव्हल १.० घेऊन परत जात असून त्याची डायलिसीसची गरज संपली आहे.
–डॉ. नयनेश चव्हाण, किडनी आणि डायलिसीस तज्ञ, एसएमबीटी हॉस्पिटल