नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक-औरंगाबाद महामार्गावर मिरची हॉटेल सिग्नल चौफुलीवर ट्रक आणि खासगी बसचा अपघात झाला आहे. ही बस SMBT कॉलेजच्या विद्यार्थ्यांची असल्याचे समोर आले आहे. ट्रकने जोरदार धडक दिल्याने ही कॉलेज बस उलटली आहे. बसमधील कॉलेजचे २५ हून अधिक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवानं जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप नाही. ट्रक आणि खासगी बस भरधाव वेगात असल्याने हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. आज (शुक्रवार ४ फेब्रुवारी) सकाळी ७ वाजेच्या सुमारास हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, धामणगाव येथील एसएमबीटी कॉलेजचे विद्यार्थी आणि कर्मचारी यांना घेऊन कॉलेजची बस (MH 15 EF 2526) जात होती. नाशिक शहरातील तपोवनजवळील हॉटेल मिरची चौफुली वळणावर बस आली. त्याचवेळी औरंगाबादकडून भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रकने कॉलेज बसला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की बस पलटी झाली. त्यावेळी मोठा आवाज झाला. बसमधील २६हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी आडगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.