नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्राच्या इगतपुरी तालुक्यातील निसर्गरम्य पण ओसाड माळरानावर वसलेले एसएमबीटी हॉस्पिटल आज राज्यात आरोग्यसेवेचे एक आदर्श मॉडेल ठरत आहे. अवघ्या दशकभरापूर्वी जिथे पायवाटाही नव्हत्या, तिथे आज एसएमबीटीच्या रूपाने एक चळवळ उभी राहिली आहे. हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत ४० लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार केले असून, ३ लाखांहून अधिक रुग्णांना आंतररुग्ण विभागात दाखल करून सेवा दिली आहे. २ लाख शस्त्रक्रिया तर २१,३४५ क्लिष्ट हृदयशस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत. याठिकाणी ६०० हून अधिक डॉक्टर, नर्सिंग आणि तांत्रिक कर्मचारी मिळून ३ हजार कर्मचाऱ्यांचे सामर्थ्य आज याठिकाणी कार्यरत आहे.
१२०० बेड्स, १७ मॉड्युलर ऑपरेशन थियेटर्स, सुसज्ज अल्ट्रा मॉडर्न कॅथलबमध्ये दररोज शेकडो रुग्णांना नवे जीवन मिळाले आहे. याठिकाणी ऑपरेशन आधी आणि नंतरची काळजी प्रशिक्षित स्टाफकडून घेतली जात असल्यामुळे रुग्णांचा बरे होण्याचा दर वाढला आहे. हॉस्पिटलमध्ये दररोज सुमारे १००० रुग्ण विविध भागांतून उपचारासाठी दाखल होतात.
विशेष म्हणजे, इथे केवळ शासकीय योजनांमधील मोफत सेवा नाही, तर अनेक अशा शस्त्रक्रिया ज्या योजनांमध्ये येत नाहीत, त्या देखील ‘आरोग्यसाधना’ शिबिराच्या माध्यमातून मोफत केल्या जात आहेत. योजनेअंतर्गत मोफत नसलेल्या आजारांवरील उपचार घेण्यासाठी रुग्णांना केवळ पथोलॉजी, रेडिओलॉजी तपासण्या आणि सवलतीतील औषधांचा खर्च उचलावा लागतो. ही केवळ रुग्णसेवा नव्हे, तर सामाजिक दायित्व आणि वैद्यकीय मूल्यांचं जिवंत उदाहरण आहे. एसएमबीटीत सध्या हृदयविकार, कर्करोग, किडनी विकार, मेंदू आणि मणक्याचे आजार, स्त्रीरोग, बालरोग, मूत्रविकार, पोटविकार, जनरल सर्जरी, किडनी आणि डायालिसिस अशा २६ पेक्षा अधिक सुपर स्पेशालिटी सेवा एकाच छताखाली उपलब्ध आहेत. जागतिक दर्जाची आरोग्यसेवा आणि वैद्यकीय ताकद इथे उपलब्ध असल्याने हजारो रुग्णांची पावले आता एसएमबीटीकडे वळू लागली आहेत.
इथे काम करणारे डॉक्टर फक्त व्यवसाय, नोकरी म्हणून नव्हे, तर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सेवा देतात. त्यांच्या समर्पणामुळे या दुर्गम भागातही आज तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि विश्वासार्ह उपचारपद्धती विकसित झाल्या आहेत. एसएमबीटी हॉस्पिटल हे आज केवळ एक हॉस्पिटल न राहता, ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा कणा ठरत आहे. इथे उपचार म्हणजे फक्त औषध नव्हे, तर विश्वास, आपुलकी आणि आधार आहे. ही आरोग्य चळवळ आता थांबणार नाही ती अधिक विस्तारतच जाणार आहे आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणार आहे असल्याचे येथील डॉक्टर सांगतात.
आज एसएमबीटी हॉस्पिटल केवळ आरोग्यसेवेचे केंद्र न राहता, ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचा एक सशक्त आधारबिंदू आहे. रुग्णांचा विश्वास, डॉक्टरांची निःस्वार्थ भावना आणि संस्थेच्या नेतृत्वाची दूरदृष्टी यामुळे या डोंगराळ भागातही जीवनदायिनी सेवा रुजली आहे. जिथे पूर्वी कुणी यायचे धाडस करत नव्हते, तिथे आज राज्यभरातून रुग्ण येतात, बरे होतात आणि आपल्या गावात आशेचे दीप लावून जातात. ही केवळ आरोग्यसेवा नव्हे तर ही एक शाश्वत परिवर्तनाची सुरुवात आहे.
एसएमबीटी कॅन्सर इन्स्टिट्युटला टाटा मेमोरियल सेंटरचे तांत्रिक मार्गदर्शन
दर्जेदार आरोग्यसेवा पुरविण्यासाठी याठिकाणी अत्याधुनिक बीएमटी अर्थात बोन मरो ट्रान्सप्लांट युनिट, कार टी सेल थेरपी युनिट उभारण्यात आले आहे. यामुळे हजारो रक्तविकार कर्करोग रुग्णांवर उपचार करण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे, टाटा मेमोरियल हॉस्पिटलसोबतचा तांत्रिक मार्गदर्शन करार झाल्याने उपचारातील दर्जा उंचावला आहे. विशेष म्हणजे, यंदा १०० मायलोमा केसेसवर मोफत उपचार करण्याचा आमचा मानस आहे.
डॉ.गिरीश बदरखे, रक्तविकार कर्करोगतज्ञ, एसएमबीटी हॉस्पिटल
१० वर्षांपासून या चळवळीत कार्यरत
ही केवळ वैद्यकीय सेवा नाही तर ही एक आरोग्य चळवळ असून मी या चळवळीत स्वखुशीने गेल्या १० वर्षांपूर्वी सहभागी झालो. माझ्यासमोर अनेक डॉक्टरांनी मुंबई-पुणेसह इतर महत्वाची मोठी शहरे सोडून या डोंगराळ भागात काम करण्याचा निर्धार केला. आज उत्तर महारष्ट्रातील सर्वात अद्ययावत असा हा हृदयविकार विभाग साकारण्यात आला आहे. याठिकाणी क्लिष्ट हृदयविकारासंबंधित तावी, आयव्हस आणि रोटा सारख्या कॉम्प्लेक्स अन्जिओप्लास्टी होत आहेत.
डॉ. गौरव वर्मा, हृदयविकार तज्ञ, एसएमबीटी हॉस्पिटल
ही तर संस्कारांची परंपरा
इथे येणारा प्रत्येक रुग्ण आम्हाला केस म्हणून नाही, तर माणूस म्हणून दिसतो. लोक समजतात की मोठं काही करायचे असेल तर शहरात जावे लागते. पण आम्ही डोंगराळ भागात सेवा देऊन हजारोंचे आयुष्य बदलतो आहोत. हाच आमचा आत्मसन्मान आहे. ही आरोग्यसेवा नव्हे, ही संस्कारांची परंपरा आहे.
डॉ. मीनल मोहगावकर, अधिष्ठाता, एसएमबीटी हॉस्पिटल