नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- एसएमबीटी मेडिकल सायन्सेस ॲण्ड रिसर्च सेंटर, एसएमबीटी डेंटल कॉलेज संगमनेर, एसएमबीटी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस ॲण्ड रिसर्च सेंटर, एसएमबीटी इन्स्टिट्युट ऑफ डेंटल सायन्सेस ॲण्ड रिसर्च येथील एकूण ३२ विद्यार्थ्यांना आरोग्य संशोधन विभाग (DHR) व भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आयसीएमआरची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. तसेच आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून देण्यात येणारी एसटीआरजी शिष्यवृत्ती ४८ विद्यार्थ्यांना प्राप्त झाली आहे. याबाबतची माहिती अधिष्ठाता डॉ मीनल मोहगावकर आणि डेंटल कॉलेजचे प्राचार्य डॉ. अशोक पाटील यांनी दिली. या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांमधील संशोधनाचा टक्का वाढेल आणि नवनवीन संशोधने वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हातून येणाऱ्या काळात घडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले.
अधिक माहिती अशी की, वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमधील संशोधनातील टक्का वाढावा, जास्तीत जास्त विद्यार्थी संशोधनाकडे वळावेत तसेच त्यांनी केलेल्या संशोधनाचा फायदा सामाजिक कार्यासाठी व्हावा या उद्देशाने दरवर्षी आरोग्य संशोधन विभाग (DHR) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) व आरोग्य विज्ञान विद्यापीठ वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवत असते. संशोधन किंवा इनोव्हेशन यामध्ये आवड असलेले विद्यार्थी याठिकाणी अर्ज करतात.
यावर्षी एसएमबीटीच्या पाच महाविद्यालयांच्या माध्यमातून अर्ज पाठविण्यात आले होते. त्यातून तब्बल ८० विद्यार्थ्यांची निवड या संशोधन शिष्यवृत्तीसाठी झाली. विद्यार्थ्यांना पुढील तीन वर्षांत शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे. यात विद्यार्थ्यांनी केलेले संशोधन सामाजिक आरोग्य तसेच वेगवेगळया आरोग्य विषयक बाबीत उपयोगी होईल यासाठी महत्त्वाचे आहे.
विद्यार्थ्यांनी केलेले संशोधन सामाजिक आरोग्य जपण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात बळकटी आणण्यासाठी केला जातो. मुख्यत्वे, या संशोधनाचा उपयोग निरोगी समाज घडविण्याच्या दृष्टीकोनातून केला जातो. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातीलच शिक्षक मार्गदर्शक म्हणून लाभत असल्यामुळे विद्यार्थी शिक्षक संवाददेखील यामुळे दृढ झाला असून शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात रुची वाढेल असेही बोलले जात आहे.
देशभरातील विद्यार्थांनी पाठिलेल्या अर्जावर आयसीएमआरची एक समिती अर्जांचे मूल्यमापन करून निवड जाहीर करत असते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसह खासगी संस्थादेखील विद्यार्थ्यांची नावे व त्यांचे प्रकल्प या शिष्यवृत्तीसाठी पाठवते. त्यामुळे एवढ्या स्पर्धेतदेखील एसएमबीटीच्या वेगवेगळ्या महाविद्यालयांचे ८० विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र झाल्यामुळे मानाचा तुरा खोवण्यात यश आले आहे.
विद्यार्थ्यांना यानिमित्ताने राष्ट्रीय पातळीवर संधोधन करण्यासाठीचे प्रतिनिधित्व करता येते. तसेच वैद्यकीय महाविद्यालय स्तरावर शिक्षण घेत असताना संशोधन संस्कृती रुजवता येते व याचा फायदा या विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातदेखील करता येतो यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांचा कल याकडे वाढलेला दिसून येत आहे.
संशोधनाकडे करीयर म्हणून पाहावे
एसएमबीटीतील प्रत्येक विद्यार्थी कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात आपली उल्लेखनीय कामगिरी करू पाहत आहे. याठिकाणी सर्वच महाविद्यालयात चांगली संशोधन संस्कृती रुजविण्यात यश आले आहे. अनेक विद्यार्थ्यांचे संशोधन प्रकल्प राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध झाले आहेत. शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणारे अर्थसहाय्य यामुळे संशोधनाच्या वाटा खुल्या झाल्या आहेत. संशोधन क्षेत्रात खूप वाव असून विद्यार्थ्यांनी याकडे करीयर म्हणून पाहावे. डॉ. अशोक पाटील, प्राचार्य, एसएमबीटी डेंटल कॉलेज हॉस्पिटल संगमनेर
६०० पेक्षा अधिक संशोधन प्रकल्प प्रकाशित होणार
एसएमबीटी शैक्षणिक संकुलमधील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याकडून वेगवेगळ्या संधी गवसल्या जात आहेत. सध्या ८० प्रकल्पांना अनुदान मिळाले असून एसएमबीटीच्या अंतर्गत काही प्रकल्पांचे काम सध्या सुरु आहे. वेगवेगळ्या स्तरावर संशोधन सुरु असून तब्बल ६०० हून अधिक संशोधन प्रकल्प आणि शोधनिबंध प्रकाशित करण्याकडे वाटचाल सुरु असल्याचे संशोधन समन्वयक डॉ अभिजित तांबे यांनी सांगितले.