नाशिक – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट अशी ओळख असलेल्या स्मार्ट स्ट्रीट लाईटिंग या प्रकल्पांतर्गत ९२ हजार एलईडी बसवले जाणार होते. मात्र या कामाची मुदत नोव्हेंबर २०२० अर्थातच दहा महिन्यापूर्वी संपली असून अद्यापही ठेकेदाराने काम पूर्ण केलेले नाही. सुरुवातीला मुदत संपल्या नंतरही महापालिका दंड भरण्यास टाळाटाळ करत होती. मात्र यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी तत्काळ महापालिकेला विचारणा केली. त्यानंतर पालिकेने ८२ लाख रुपयांचा दंड केल्याची कबुली दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिली आहे.
या कामाबाबत बोलतांना ते म्हणाले की, मुळात तब्बल दहा महिने ठेकेदार काम करत नसेल तर सत्ताधारी भाजपाचे लक्ष नेमके कोठे आहे, दत्तक नाशिकचा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होत नसेल तर नाशिककरांचे दुर्दैव आहे. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार असेही त्यांनी सांगितले.