मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आकर्षक दिसणाऱ्या खेळणी मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक ठरल्या आहेत. हा प्रकार गांभीर्याने घेत केंद्राने खेळणी विक्रीसंदर्भातील नियमावली कठोर केली आहे. मात्र त्यानंतरही देशभरात निकृष्ठ दर्जाच्या खेळण्यांची सर्रास विक्री केली जात असल्याची बाब समोर आली. त्यानंतर भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) देशभरात धाडसत्र सुरू केले आहे. आतापर्यंत १८,६०० हुन अधिक खेळणी जप्त करण्यात आली आहेत.
बीआयएस मानांकनाशिवाय खेळणींच्या विक्रीवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. यानंतरही विक्रेते बिगर मानांकन असणाऱ्या खेळण्यांची विक्री करीत आहेत. मोठ मोठे शोरूमही त्यात मागे नाहीत. अगदी हॅमलीज आण आर्चिस यासारख्या नामांकित प्रतिष्ठानांवरही कारवाई केली गेली. याव्यतिरिक्त केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील या बडय़ा ई-वाणिज्य कंपन्यांनाही नोटीस बजावली आहे.
देशभरात ४४ छापे
भारतीय मानक विभागाकडून १२ जानेवारीला देशभरात मोठी कारवाई केली. गेल्या महिनाभरात ४४ प्रतिष्ठानांवर छापे टाकण्यात आले आहेत. जप्त केलेल्या खेळण्यांत स्थानिक स्तरावर उत्पादित, तसेच आयात खेळण्यांचा समावेश आहे. ‘हॅमलीज’,‘आर्चिस’ या नामांकित खेळणी विक्रेत्या कंपन्यांसह ‘डब्ल्यू. एच. स्मिथ,’ ‘किड्झ झोन’, ‘कोकोकार्ट स्टोअर’, ‘टियारा टॉय झोन’च्या दुकानांवर छापे टाकण्यात आले.
काय सांगतो कायदा?
केंद्र सरकारने खेळणींसाठी सुरक्षा नियम निश्चित केले आहेत. १ जानेवारी २०२१ पासून या नियमांची अंमलबजावणी सक्तीची करण्यात आली आहे. त्यानुसार खेळण्यांवर ‘बीआयएस’ मार्क अनिवार्य आहे. त्याशिवाय खेळण्यांची निर्मिती, विक्री, आयात किंवा वितरण करता येत नाही. त्याशिवाय काही खेळण्यांवर ‘आयएसआय’ हे मानकचिन्हही असणे आवश्यक आहे. ते नसेल तर ते खेळणे निकृष्ट ठरविण्यात येते. लहान मुलांची सुरक्षा महत्त्वाची असल्याने खेळण्यांसाठी विविध सुरक्षा पैलूंचा आधार घेत मानके तयार करण्यात आली आहेत. खेळण्याला टोकदार कडा किंवा धारदारपणा असू नये जेणेकरून खेळताना मुलांना इजा होणार नाहीत, ती ज्वलनशील घटकांनी तयार केलेली नसावीत, विषारी घटकांचा समावेश नसावा असे हे नियम आहेत. देशांतर्गत उत्पादकांव्यतिरिक्त, आयात केलेली खेळणी आणि परदेशी उत्पादकांनाही हा आदेश लागू आहे.
Small Children’s Toys BIS Raid Action