– चिमुकला देखील बापासोबत सामाजिक दाइत्वात पुढे
– पिंपळगावी इरावर यांच्याकडून कोविड रुग्णांवर अंत्यसंस्कार
प्रतिनिधी, पिंपळगाव बसवंत (ता. निफाड)
कोरोनाचा मृतदेह हातात पडला किंवा मिळाला की, नातेवाईक देखील पाठ सोडत आहेत. अशा संवेदनशील परिस्थितीत येथील स्मशानभूमीत अनोखे चित्र दिसते आहे. येथील अमरधाम कर्मचारी पंकज इरावर व त्यांचा अवघ्या ११ वर्षांचा मुलगा अनिकेत जीवावर उदार होऊन माणुकीच्या नात्याने कोविड रुग्णांवर अंत्यसंस्कार करीत आहेत. त्यामुळे ते परिसरातले रिअल हिरो असल्याचे बोलले जात आहे.
कोरोना पॉझिटिव्ह हा जणू अंगावर काटा आणणारा शब्द. सध्या प्रत्येक जण कोरोनापासून लांब राहण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा अवस्थेत कोरोनाग्रस्त मृतदेहाजवळ कोण जाणार ? त्यांच्यवर अंत्यसंस्कार कोण करणार ?
सख्खा मुलगा, सख्खे नातेवाईक मृतदेहाला हात लावायला धजावत नाहीत. अशा कोरोनाच्या भयावह परिस्थिती देखील माणुसकीच्या भावनेने पिंपळगाव बसवंत येथील स्मशानभूमीतील कर्मचारी पंकज इरावर येथील कोविड रुग्णावर अंत्यसंस्कार करत आहेत. शिवाय येथील स्मशानभूमीत कोविड अंत्यविधीसाठी मृतदेह वेटिंग असल्यास त्यांचा ११ वर्षीय मुलगा अनिकेत देखील जीवावर उदार होऊन वडिलांना मदत करत आहे. गेल्या १५ दिवसात ६०हून अधिक मृतदेहांवर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. आजही अविवरत निःशुल्क भावनेने ते ही सेवा करत आहेत. या बापलेकाचे कार्य अनोख्या माणुसकीचे दर्शन घडवित आहे.
—
मी पाचवीच्या वर्गात शिकत आहे. कोरोनामुळे सध्या शाळा बंद आहे. माझे वडील येथील स्मशानभूमीत कोविड रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम करत आहेत. येथे गर्दी झाल्याने मी त्यांना मदत करते.
– अनिकेत इरावर, पिंपळगाव बसवंत
—
कोरोना काळात रक्ताची नाती देखील कामी येत नाहीत. अशा परिस्थितीत आम्ही सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत कोविड रुग्णांचे नातेवाईक होत आहोत. केवळ माणुसकीच्या भावनेने अंत्यसंस्कार करत आहोत.
– पंकज इरावर, कर्मचारी अमरधाम, पिंपळगाव बसवंत