इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – डॉक्टर हे देवदूत आहेत, असे मानले जाते. एखाद्याला मृत्यूच्या दाढेतून खेचून आणण्याचे कौशल्य या डॉक्टरांकडे असते. त्यामुळेच त्यांच्याकडून कायमच चांगल्या वागणुकीची अपेक्षा असते. त्यांचे वागणे जरा जरी चुकले तरी ते लोकांना पटत नाही आणि डॉक्टरांवर टीका केली जाते. असाच एक प्रकार नुकताच घडला आहे. डॉक्टरी पेशाला काळिमा फासणारी घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. अवघ्या २२ दिवसांच्या बाळाची सात लाख रुपयांत विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका डॉक्टरसह नर्सिंग होममधील दोन सहकारी, मूल विकणारा पुरुष दलाल डेमन्ना आणि एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले.
उल्हासनगर शहरातील कॅम्प क्रमांक ३ येथील महालक्ष्मी नर्सिंग होममधील एका लहान बाळाची विक्री होत असल्याची माहिती ठाणे क्राईम ब्रँचला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तेथे छापा टाकला. अवघ्या २२ दिवसांच्या बाळाची सात लाख रुपयांत विक्री करण्याचा हा धक्कादायक प्रकार ठाणे क्राईम ब्रँचने उघडकीस आणला. महालक्ष्मी नर्सिंग होममध्ये एका महिलेला बनावट ग्राहक बनून पाठवण्यात आली आणि मग हा प्रकार मोडून काढण्यात आला.
बनावट ग्राहक म्हणून पाठविलेल्या महिलेने, आपल्याला दोन मुली असून मुलगा हवा आहे, असे सांगितल्यावर २२ दिवसांच्या बाळाचा सात लाखांत सौदा झाला. नर्सिंग होमच्या डॉ. चित्रा चैनानी, यांच्या सहकारी संगीता, प्रतिभा आणि बेळगावमधील मूल विकणारा दलाल डेमन्ना आणि मूल विकण्यास तयार झालेली महिला (नाव गुप्त ठेवले आहे.) यांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
बाळांच्या विक्रीचे रॅकेट?
उल्हासनगरात यापूर्वीही लहान बाळांच्या विक्रीचे प्रकरण गाजले होते. यामध्ये नर्सिंग होमच्या डॉक्टरसह सहकाऱ्यांचा सहभाग असल्याचे उघड झाले होते. महालक्ष्मी नर्सिंग होममधून आतापर्यंत किती लहान मुलांची विक्री करण्यात आली, याचा तपास करण्यासाठी १० जणांचे पथक स्थापन केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ग्राहक बघून किंमत
अवघ्या २२ दिवसांच्या बाळाची सात लाखांना विक्री झाल्याचे या प्रकरणात समोर आले आहे. परंतु ग्राहक बघून वेगवेगळ्या रकमेला बाळांची विक्री होत असल्याचा पोलिसांना संशय आहे.
Small Child Sale Racket Burst by Police