नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील सातपूर परिसरात आज एक हृदयद्रावक घटना घडली. पाण्याच्या बादलीत पडून सहा महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. हा चिमुकला सोमवारी घरात खेळत होता. त्याचवेळी तो खेळता खेळता बाथरुमकडे गेला. या बाथरुममध्ये पाण्याने भरलेली बादली होती. अनावधानाने हा चिमुरडा या बादलीत पडला. त्याच्या नाक आणि तोंडात पाणी गेले. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने त्याला बादलीबाहेर काढले. तसेच, त्याला उपचारार्थ दवाखान्यात दाखल केले. पण, उपचारादरम्यान या चिमकल्याचा मृत्यू झाला. त्र्यंबकेश्वर रोडवरील बंदावणे मळा येथील या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत चिमुकल्याचे नाव शिरीष भिका जयसिंग असे आहे. या दुर्घटनेमुळे त्याच्या मातेने हंबरडा फोडला. तसेच, त्याच्या कुटुंबियांवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे.