मुंबई – लोक त्वचा फ्रेश ठेवण्यासाठी अर्थात स्कीन ग्लो करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. पण जेवढे आपण निसर्गाच्या जवळ जाऊ, नैसर्गिक उपाय करू तेवढेच बरे असते, हे वारंवार सिद्ध झाले आहे. आता तुम्हाला जर सांगितले की दररोज चपाती खाल्ल्याने स्कीन ग्लो करते, तर त्यावर विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे. गव्हाची चपाती खाल्ल्याने त्वचा चमकदार होते. कारण गव्हामध्ये झिंक मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे दररोज जेवणात चपाती न चुकता खायला हवी. चपातीचे आणखीही अनेक गुण आहेत. ते आज जाणून घेऊया…
चपाती प्रत्येक घरात बनते. दालफ्राय असो वा भाजी किंवा अगदीच श्रीखंड असो, चपातीचे समीकरण या साऱ्यांशी जुळते. काही लोक चपाती खाण्याचे टाळतात. पण त्यामुळे ते स्वतःचे नुकसान करून घेतात. गव्हात अनेक व्हिटामीन्स आणि मिरल्स असतात. व्हिटामीन बी, ई, कॉपर, झिंक, आयोडीन, मॅंगनीज, सिलीकॉन, पोटॅशियम, कॅल्शीयमची मात्रा गव्हात असते. गव्हाच्या कणकेतून तयार झालेल्या पोळ्यांमध्ये फायबरही असते. हे फायबर ह्रदयाचे काम नीट चालण्यासाठी मदत करते. कणकेतील फायबरचे प्रमाण कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते. चपातीमध्ये व्हिटामीन बी मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. आणि विशेष म्हणजे गहू हे सर्वांत सहज पचणारे धान्य आहे. गव्हाच्या कणकेने तयार झालेल्या पोळ्यांनी त्वचा चमकदार होते. त्यामुळे एकादृष्टीने गहू हे सुपरग्रेन आहे. एका संशोधनात चपातीमध्ये ७० कॅलरी, ३ ग्राम प्रोटीन, ०.४ ग्राम फॅट्स आणि १५ ग्राम एनर्जी देणारे कार्बोहायड्रेट्स असतात, असे सिद्ध झाले आहे.