मुंबई – नियमित विद्यार्थ्यांसह शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी वरदान असलेल्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाच्या विविध ३०१ अंशकालीन व पूर्णवेळ अभ्यासक्रमांची माहिती आता नवीन संकेतस्थळावर मिळणार आहे. www.msbsd.edu.in या नव्या संकेतस्थळाचे तसेच मंडळाच्या बोधचिन्हाचे (Logo) नुकतेच राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकतामंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
मंत्री श्री. मलिक म्हणाले, मंडळाचे पूर्वीचे नाव महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ होते व जुनी वेबसाईट कार्यरत होती. आता मंडळाच्या नावात बदल झाल्यामुळे नवीन अद्ययावत वेबसाईट बनविण्यात आली आहे. व्यवसाय शिक्षण या संकल्पनेतून स्थापन झालेल्या या मंडळामार्फत रोजगार व स्वयंरोजगारासाठी व्यवसायाभिमुख प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविण्यात येतात. औद्योगिकरणातील वाढ, बदलते तंत्रज्ञान, सामाजिक व आर्थिक बदल इत्यादींमुळे मंडळाच्या अभ्यासक्रमात कालानुरुप सुधारणा तसेच वाढ करुन सद्यस्थितीत मंडळामार्फत 28 गटातील 6 महिने, 1 वर्ष व 2 वर्ष कालावधीचे अंशकालीन व पूर्णवेळ स्वरुपाचे 301 अभ्यासक्रम चालविण्यात येत आहेत.
शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी मंडळाचे अभ्यासक्रम वरदान
मंत्री श्री. मलिक म्हणाले, नियमित विद्यार्थ्यांसह शिक्षण अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच विशिष्ट शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंडळामार्फत कमी कालावधीचे व्यवसाय अभ्यासक्रम (ॲड ऑन कोर्सेस) चालविण्यात येतात. सध्या मंडळांतर्गत 301 अभ्यासक्रम राबविण्यात येतात. हे अभ्यासक्रम जिल्हा, तालुकास्तरावर तसेच ग्रामीण भागात मंडळाने मान्यता दिलेल्या 1 हजार 269 संस्थांमध्ये राबविण्यात येत आहेत. विशेषत: खेड्यापाड्यातील, गोरगरीब विद्यार्थी मंडळाच्या मान्यताप्राप्त संस्थांमध्ये प्रवेश घेऊन प्रशिक्षण पूर्ण करतात. मंडळाचे अभ्यासक्रम हे रोजगार व स्वयंरोजगारास चालना देण्याच्या दृष्टीने विशेष करुन शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरतात. या सर्व अभ्यासक्रमांची माहिती आता नव्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊन कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळवावे, असे आवाहन त्यांनी केले.