विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
दिल्ली आणि उत्तर प्रदेश भागात काही भामट्यांनी अनेक ठिकाणी चोऱ्या करून कोट्यवधीचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केले होते. या चोरट्यांनी चोरीच्या रकमेतून चक्क जमीन आणि कार खरेदी केली. अटक केलेल्या आरोपींमध्ये रोख रक्कम व सोन्याचे वाटप करण्यावरुन भांडण झाले. त्यामुळे अखेर ही चोरीची घटना उघड झाली असून पोलिसांनी चोरट्यांकडून कोट्यवधीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
विशेष म्हणजे ही कोट्यवधीची संपत्ती जप्त झाली असली तरी या संपत्तीच्या मूळ मालक असलेल्या वकीलाने देखील प्रचंड गैरव्यवहार करून ही कोट्यवधीची संपत्ती मिळवली असल्याचे उघड झाले आहे, आणखी विशेष म्हणजे या चोरी प्रकरणात संबंधित वकिलांनी कोणतीही तक्रार केली नव्हती. कारण ‘चोरीचा मामला हळूहळू बोंबला’ अशीच काहीसे या प्रकरणात घडले असे म्हणता येईल.
गाझियाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठी चोरी उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले. एका टोळीतील सहा चोरट्यांना अटक केली असून आरोपींकडून ६ कोटी ५० लाख रुपयांचे सोने आणि ५८ लाखांचे चांदीचे दागिने आणि १ कोटी २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीसांच्या चौकशी दरम्यान आरोपींनी सांगितले की, त्यांनी आपल्या एकूण २३ साथीदारांसह सप्टेंबर २०२०मध्ये सूरजपूर येथील सिल्व्हर सिटी सोसायटी डेल्टा -१ मधील फ्लॅटमधून कोट्यवधी रुपये किमतीचे सोन्याचे व रोकड चोरुन नेले होते.
पोलिसांनी आरोपींकडून ५७ लाख रोख रक्कम, सोन्याचे दागिने, कार आणि जमीन कागदपत्रे जप्त केली आहेत. आरोपींकडून जप्त केलेली गाडीही चोरीच्या पैशातून खरेदी केली होती. या आरोपींकडून एकूण सव्वा ८ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका वकीलाच्या घरातील ही संपत्ती चोरली आहे. केला. विशेष म्हणजे मूळचे अलाहाबाद येथील रहिवासी किश्ले पांडे असे या वकीलाचे नाव असून त्याच्याविरूद्ध गुरुग्राम, दिल्लीसह इतर ठिकाणी फसवणूकीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याने आम्रपाली ग्रँडमध्ये विकत घेतलेला बंगला हा गैरव्यवहाराच्या पैशातून खरेदी केला होता. आता चौकशीनंतर त्याला या प्रकरणात सहआरोपी बनवले आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती समजल्यानंतर किश्ले पांडे यांनी पोलिसांना फोन केला आणि तो सध्या अमेरिकेत असल्याचे त्याने सांगितले.
वकिलाच्या घरातून कोट्यवधी रुपयांची चोरी झाली असूनही त्यांनी पोलिसांना कोणतीही तक्रार दिली नाही. आरोपींना पकडले असता ही घटना उघडकीस आली. वकील पांडे पिता-पुत्र दोघेही फसवणूकीच्या नेटवर्कशी जोडलेले आहेत. त्याच्याविरूद्ध इंडिया बुल कंपनीने गुन्हा दाखल केला आहे. त्याचप्रमाणे अटक केलेल्या आरोपींमध्ये रोख रक्कम व सोन्याचे वाटप वरून भांडण झाले. यानंतर आरोपींपैकी एक आरोपी पोलिसांना सापडला आणि त्याने या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याच्या माहितीच्या आधारे अन्य आरोपीला अटक केली. आता पोलिस आयुक्त आलोक सिंह यांनी कारवाई करणार्या पथकाला १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.