नाशिक : गॅस सिलेंडरच्या स्फोटात जखमी झालेल्या आठ जणांपैकी सहा जणांचा मृत्यु झाला. शुक्रवारी (दि.९) मध्यरात्री गंभीर भाजलेल्या चौथ्या युवकाचाही मृत्यु झाला. यापूर्वी एकाच कुटूबांतील चौघांसह मृत तरूणाच्या भावाचा मृत्यु झाला.त्यात दोन महिलांचा समावेश आहे. या दुर्घटनेत मृतांचा आकडा आता सहावर पोहचला आहे.
रमजान वलीउल्ला अन्सारी(२२) असे उपचारादरम्यान मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. वडाळानाका भागातील संजरी इमारतीत गेल्या शुक्रवारी रात्री घरगुती गॅस सिलिंडर बदलताना गळती होऊन स्फोट झाल्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत सैय्यद कुटुंबातील चौघांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला होता. त्यात नसरीन व सईदा या नणंद भावजयीसह दोघा सख्ख्या भावांचा समावेश आहे. त्यानंतर अन्सारी कुटुंबातील शोएब अन्सारी याचा मृत्यु झाला होता.त्यापाठोपाठ त्याचा भाऊ रमजानचीही प्राणज्योत मालवली असून तो खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.