मुंबई – नुकतेच मुख्य सचिव पदावरून निवृत्त झालेले श्री. सीताराम कुंटे यांचा प्रशासनातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांची नियुक्ती मुख्यमंत्री सचिवालयात प्रधान सल्लागार या पदावर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील निर्देश आज दिले. तसेच, राज्याच्या मुख्य सचिवपदी देबाशिष चक्रवर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कुंटे निवृत्त होत असल्याने त्यांना ३ महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी विनंती राज्य सरकारने केंद्र सरकारला केली होती. मात्र, केंद्राने ती मान्य केली नाही. अखेर कुंटे निवृत्त झाले आहेत. वरिष्ठ सनदी अधिकारी देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडे मुख्य सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. चक्रवर्ती हे १९८६च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. चक्रवर्ती यांच्याकडे तीन महिन्यांसाठी मुख्य सचिवपद राहणार आहे. कारण, येत्या फेब्रुवारी २०२२मध्ये ते निवृत्त होणार आहेत. चक्रवर्ती यांनी पदभार आज स्विकारला आहे.









