– शिवाजी जाधव (प्रशिक्षक, सिन्नर क्रिकेट)
आजचा दिवस सिन्नर च्या क्रिकेट साठी अविस्मरणीय असाच आहे. कारण सिन्नरचे सिद्धार्थ नक्का आणि मनिष कातकडे हे दोन खेळाडू एकाच वेळेस नाशिक वरिष्ठ संघाच्या अंतिम 11 मध्ये खेळत आहेत. 2010 साली जेव्हा सिन्नर मधे क्रिकेटची सुरुवात झाली. तेव्हा कदाचित कुणीही असा विचार केला नसेल, की सिन्नरचे दोन दोन खेळाडू एकाच वेळी नाशिक जिल्हा संघात खेळतील.
आज क्रिकेटमध्ये इतकी प्रचंड स्पर्धा असून एका तालुका ठिकाणावरून दोन खेळाडूंनी अशी मजल मारणे खरंच ऊर भरून येण्यासारखी बाब आहे. पण हे एका दिवसात नाही झाले. या दोन खेळाडूंनी रक्ताचे पाणी करत, ऊन वारा पावसाची तमा न बाळगता मागील पाच सहा वर्षांत प्रचंड मेहनत घेतली आहे. सिन्नरहून नाशिकला रोज न चुकता सरावास ये-जा केली आहे. क्रिकेट हा खर्चिक खेळ आहे आणि रोज नाशिकला येणे-जाणे पैशाचा विचार करता सोपे नाही. पण जिद्द आणि चिकटीपुढे सर्व गौण असते. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनने देखील या दोघांच्या प्रयत्नांना बळगटी देत त्याचा हुरूप वाढवला आहे. सिद्धार्थ आणि मनिष येणाऱ्या काळात नाशिकच्या विजयात मोठे योगदान देतील तसेच पुढील टप्प्यासाठी नक्कीच पात्र होतील असा विश्वास आहे.