सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील सोनंबे येथे ट्रेलर उलटून झालेल्या अपघातात मायलेकीचा मृत्यू झाला. घोटी महामार्गावर शिव नदीवरील पुलाच्या वळणावर हा ट्रेलर उलटला. त्यात दुचाकीवर असलेल्या मायलेकी ट्रेलरखाली दाबल्या गेल्या. या मायलेकी घरी परतल्या नसल्यामुळे त्यांचे मोबाईल लोकेशन काढल्यानंतर ते ट्रेलर खाली दाबले गेल्याची घटना समोर आली. शुक्रवारी पहाटे ४ वाजता त्यांचा मृतदेह ट्रेलर खालून बाहेर काढण्यात आला.
या अपघातानंतर चालक फरार झाला आहे. या अपघातात बिलकिस हमीद शेख (३४) आणि आरमान हमीद शेख (१९) अशी ठार झालेल्या मायलेकांची नावे आहेत. या मायलेकी गुरुवारी दुपारी सिन्नर येथे बाजारासाठी आले होते. घरी परतताना त्यांनी कुटुंबीयांना सिन्नरहून निघाल्याचे फोनवरुन सांगितले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांशी संपर्क साधला.
मोबाईल ट्रॅकमुळे कळाली घटना
पोलिसांनी मायलेकीचा शोध घेतांना मोबाईल ट्रॅक केला. त्यानंतर रात्री १० वाजेच्या सुमारास मोबाईलचे लोकेशन शिवनदीच्या वळणावर उलटलेल्या ट्रेलरच्या परिसरात निघाले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर ते अपघात स्थळी आले. येथे दुचाकी या ट्रेलर खाली मायलेकी दाबल्या गेल्या असेल असा संशय पोलिसांना आला. त्यानंतर तपासाला सुरुवात झाली.
मायलेकांचे मृतदेह आढळले
संशय आल्यामुळे पोलिसांनी क्रेन बोलावून कंटेनर आणि त्यातून पडलेले पुठ्ठ्याचे गठ्ठे बाजूला करण्याचे काम हाती घेतले. त्यानंतर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास या ट्रेलर खाली दुचाकीसह दोघा मायलेकांचे मृतदेह आढळून आले.