सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात मोकाट कुत्र्यांनी १० वर्षांच्या विद्यार्थ्यावर जोरदार हल्ला केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सार्वजनिक वाचनालयाच्या बेसमेंटमधून सांगळे कॅाम्प्लेक्स येथे शिकवणीसाठी हा विद्यार्थी जात होता. त्याचवेळी त्याच्यावर सहा ते सात मोकाट कुत्र्यांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थ्याच्या मांडी, खांदा व दंडाला कुत्र्यांनी चावा घेतला. परिणामी, हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
कुत्र्यांनी अचानक हल्ला केल्यामुळे हा विद्यार्थी भिंतीवर पडला. त्यामुळे त्याच्या डोक्यालाही मार लागला आहे. कुणाल अरविंद भांडगे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. सोमवारी दुपारी तो सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या बेसमेंटमधून सांगळे कॅाम्प्लेक्से येथे शिकवणीसाठी जात होता. त्यावेळी ही घटना घडली आहे. या हल्लानंतर कुणालच्या ओरडण्याचा आवाज ऐकून वाचनालयाच्या अभ्यासिकेतील विद्यार्थी व परिसरातील नागरिक मदतीला धावून आले. या सर्वांनी कुत्र्यांना हाकलून लावले.
दरम्यान, गेल्या काही दिवसापूर्वीच चांदवड येथे मोकाट कुत्र्यांनी अनेकांना चावा घेतला होता. ही घटना ताजी असतांनाच सिन्नर येथे ही घटना घडली आहे. कुत्र्याच्या हल्लेचा हा थरार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे.
(बघा हा थरारक व्हिडिओ)