सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिन्नर शहरासह तालुक्यात गुरुवारी झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने सरस्वती नदीला पूर आला. या पावसामुळे शहरातील गल्ली परिसरात पाण्याचे पाट वाहत होते. तर अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. तर वाहनेही वाहून गेल्याच्या घटनाही समोर आल्या. नांदूरशिंगोटे परिसरातही ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार उडाला आहे.शहरातील तिन्ही पूल तसेच सिन्नर- पाटोळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आले.
या पावसामुळे काही कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे. सिन्नर-शिर्डी रस्त्यावर अष्टविनायकनगर, हुतात्मा स्मारक व संगमनेर नाका देवनदी, सिन्नर-शिर्डी रस्त्यावर पाणी साचले होते. सरस्वती नदीला जणू काही महापूर आल्यागत स्थिती होती. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नांदूरशिंगोटे परिसरासह दापूर भागातही ढगफुटीसारखा पाऊस झाला असून, दापूरमधील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. दापूरच्या बोडक्या बंधाऱ्याने धोक्याची पातळी ओलांडली असून, डोंगरावरून पाण्याचे लोंढे येत असल्याने दापूरसह परिसरातील गावांतील नागरिकांना सावधानतेचा सल्ला देण्यात आला आहे. बंधारा फुटण्याच्या शक्यतेने काही नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. दरम्यान दोडी बुद्रुक, दोडी खुर्द, चास, नळवाडी, सोनेवाडी आदी परिसरातही तुफान पाऊस झाला आहेत.
माजी आमदार राजाभाऊ वाजेचे रेस्क्यू ऑपरेशन
माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी स्वतः अनेक कुटुंबांना रेस्क्यू ऑपरेशन करून सई सलामत बाहेर काढले आज सकाळी अनेक कुटुंब एकमेकांच्या गळ्यात पडून रडत असताना दिसून आले यावरून काल झालेल्या पावसाची घटना पुनरावृत्ती होऊ नये यासाठी अनेकांनी प्रार्थना केली आहे काळ आला होता पण वेळ आली नव्हती या वाक्याप्रमाणे अनेकांनी कालचा दिवस हा आयुष्यात परत कधी येऊ नये हेच शुभचिंतन केले.