सिन्नर – खडांगळी-मेंढी-सोमठाणे या रस्त्याच्या रुंदीकरण व सुशोभीकरणासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नांतून १० कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. कोपरगाव तालुक्यातील चासनळी निफाड तालुक्यातील विंचूर,लासलगाव त्याचप्रमाणे येवला,चांदवड व मालेगाव परिसरात जाण्यासाठी वडांगळीहुन पुढे खडांगळी,मेंढी व सोमठाणे मार्गे महत्त्वाच्या असलेल्या पाटोळे ते सांगवी या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ३० मधील खडांगळी ते सोमठाणे या रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यास १० कोटी रुपये निधी देत प्रशासकीय मंजुरी दिली. आमदार कोकाटे यांनी सार्वजनिक बांधकाम सहायक अभियंता प्रवीण भोसले व कनिष्ठ अभियंता उमाकांत देसले यांच्यासह खडांगळी येथे नुकतीच प्रस्तावित रस्त्याची पाहणी केली.यावेळी खडांगळी येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश कोकाटे व आमदार कोकाटे यांचे स्वीय सहायक शिवा वाणी उपस्थित होते. रस्त्याच्या कामासंदर्भात आवश्यक त्या सूचनाही यावेळी कोकाटे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
रस्त्याचे होणार दुपदरीकरण…
खडांगळी येथे ओझर- शिर्डी या राज्यमार्गापासून हा रस्ता पुढे मेंढी मार्गे सोमठाणेकडे जाणार आहे.सध्याची ३.५० मीटर असणारी धावपट्टी ओझर-शिर्डी राज्यमार्गाइतकी म्हणजे ५.५० मीटर पर्यंत वाढून हा रस्ता दुपदरी होणार आहे.लालसगाव पासून संगमनेरला जाणाऱ्या रस्त्याला हा रस्ता सोमठाणे येथे छेदनार असल्याने प्रवाशांना या रस्त्याचा मोठा फायदा होणार आहे.वडांगळी येथे सतिमाता सामतदादा देवस्थानला येणाऱ्या भाविकांची यामुळे प्रवासाची मोठी सोय होणार आहे.
खडांगळीत साकारणार वाहतूक बेट...
खडांगळी येथे मेंढी चौफुलीवर नव्याने अनेकांनी व्यवसाय थाटले आहे.त्यामुळे वर्दळ वाढलेल्या या परिसरात असलेल्या मेंढी चौफुलीवर वाहतूक बेट बांधण्याबरोबरच चारही बाजूंच्या रस्त्यांचे १०० मीटरपर्यंत काँक्रीटीकरण करून त्याचे सुशोभीकरण करण्याबरोबरच मेंढी
गावालगतच्या रस्त्याचेही काँक्रीटीकरण करण्याच्या सूचना आमदार कोकाटे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
प्रवाशांना मोठा दिलासा…
आमदार कोकाटे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या या रस्त्यामुळे खडांगळी व परिसराचे सौंदर्य वाढणार आहे.शिवाय रस्त्याचे चढ उतार समपातळीत करण्याबरोबरच घातक वळणेही कमी करण्यात येणार आहे.रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याच्या सूचनाही आमदार कोकाटे यांनी केल्या आहेत. वडांगळी,चासनळी, विंचूर व लासलगाव या बाजारपेठेच्या गावांना जाणाऱ्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सतीश कोकाटे, सामाजिक कार्यकर्ते खडांगळी