सिन्नर – कडवा पाणीपुरवठा योजनेची बोरखिंड येथील पाणीगळती कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी नगर परिषदेच्या वतीने शनिवारी (दि. २६) व रविवारी (दि. २७) शटडाऊन घेण्याचे नियोजन केले आहे. त्यादरम्यान कडवा पाणीयोजना बंद राहणार आहे. नागरिकांनी पाण्याचा संचय करून जपून वापर करावा, असे आवाहन मुख्याधिकारी संजय केदार पाणीपुरवठा विभागाच्या अभियंता हेमलता दसरे यांनी केले आहे.
सिन्नर शहराला पाणीपुरवठा करणारी कडवा धरणातून राबविण्यात आलेली पाणीपुरवठा योजनेची ६०० मीमी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला ११ फेब्रुवारी रोजी बोरखिंड शिवारात लक्ष्मण वाघ यांच्या निवासस्थानाजवळ गळती झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य स्थानिक पातळीवर उपलब्ध नसल्याने नगरपालिका प्रशासनाची यंत्रसामग्री आणि साहित्य उपलब्ध करण्यात दमछाक झाली. त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती करून योजनेचा एक पंप सुरू करून शहराला पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र, ही गळती पूर्णपणे थांबली नाही. त्यामुळे
पाणीपुरवठा पूर्ण क्षमतेने करण्यासाठी दुसरा पंप सुरू करता आला नाही. मधल्या साधनसामग्री नगरपालिकेने उपलब्ध केली असून शनिवार आणि रविवार असे दोन दिवस शटडाऊन घेऊन गळती काढण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या काळात कडवाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसरीकडे दारणा पाणीपुरवठा योजना सुरळीत चालू राहणार आहे. मात्र, ज्या भागात कडवा पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा होतो तेथे पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे
शटडाऊनपूर्वी नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा पुरेसा संचय करून ठेवावा व पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन नगरपालिका प्रशासनाने केले आहे.