सिन्नर – तालुक्यात डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून सुमारे १ कोटी ३० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.त्यातून ६ गावांतील विद्यार्थ्यांना हक्काच्या वर्गखोल्या मिळण्याबरोबरच विविध विकास कामे होणार आहेत. कोविडमुळे नवीन विकास कामांवर लावलेले निर्बंध आता काही प्रमाणावर उठले आहेत.डोंगरी तालुक्यांना विकास कामांसाठी शासनाकडून मिळणारा निधीही आता काही प्रमाणात मुक्त करण्यात आला आहे.आमदार माणिकराव कोकाटे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील शाळा व अंगणवाडी इमारत,रस्ते,पूल व सामाजिक सभागृह बांधकाम आदी कामांना निधी व प्रशासकीय मान्यता देण्याची शिफारस केली होती.त्यानुसार १३ गावांतील सुमारे १ कोटी ३० लाख रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाल्याने संबंधित गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
विद्यार्थ्यांना मिळणार हक्काची इमारत…
कोविड नंतर शाळा व अंगणवाड्या आता पूर्वपदावर येत आहे.त्यामुळे पुन्हा एकदा अनेक ठिकाणी वर्गखोल्यांची अडचण भासू लागली आहे.शिक्षणात वर्गखोल्यांअभावी खंड पडू नये म्हणून आमदार कोकाटे यांनी कारवाडी येथे जिल्हा परिषद शाळा वर्ग खोली बांधकामासाठी ९ लाख रुपये, देवपुर,पाथरे बु, मिठसागरे, वारेगाव व सांगवी या गावांमध्ये अंगणवाडी इमारत बांधकामासाठी प्रत्येकी ८ लाख रुपये तर सामाजिक सभागृह बांधकामासाठी कहांडळवाडी येथे ५ लाख रुपये,पांढुर्ली येथे १० लाख,धोंडबार व हिवरे येथे प्रत्येकी १५ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
पंचाळे परिसराचे दळणवळण होणार सुलभ..
पंचाळे परिसराला मेंढी व खडांगळी येथून जोडणाऱ्या रस्त्यांवर पुलांअभावी पावसाळ्यात वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या रस्त्यांवर मोऱ्यांच्या बांधकामासाठीही निधी मंजूर झाला आहे.मेंढी येथे मेंढी-पंचाळे रस्त्यावर व खडांगळी येथे खडांगळी-पंचाळे रस्त्यावर मोरी बांधकामास प्रत्येकी १२ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.भोजापूर खोऱ्यात चास येथील चास-ठाकरवाडी या रस्त्यासाठी सुमारे १० लक्ष रुपये निधी मंजूर झाला आहे.