सिन्नर – जन्म दिलेल्या बापाने आपल्या १४ वर्षीय मुलीचा विनयभंग करत या प्रकाराची वाच्यता केल्यास तिच्यासह आजीला जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सिन्नर शहरातील नाशिक वेस परिसरात घडली. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पीडित मुलगी तिच्या आजीसोबत घरात असताना सायंकाळी सातच्या सुमारास पित्याने पीडित मुलगी व तिच्या आजीला शिवीगाळ व दमदाटी करत पीडित मुलीला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. या प्रकाराची वाच्यता केल्यास मुलगी व आजी दोघींना जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर घाबरलेल्या पीडित मुलीने सिन्नर पोलिस ठाण्यात जाऊन आपबीती कथन केली. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पित्याविरोधात लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक धुमाळ तपास करत आहे.