सिन्नर – शहरातील मध्यवस्तीत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सिन्नर फुटवेअरच्या दुकानात आग लागल्याची घटना घडली. हे दुकान चेतन सातपुते यांचे मालकीचे आहे. सकाळी सात वाजेच्या सुमारास या दुकानांमधून धूर येताना नागरिकांना दिसतास नागरिकांची क्षणार्धात धावपळ उडाली. काही वेळातच आगीने लोळ येण्यास सुरुवात झाली. याची खबर अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर अग्निशामक जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळे ही आग आटोक्यात आली. या आगीत लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार, आरोग्य निरीक्षक रवी देशमुख आदी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन विभागाचे लाला वाल्मिकी, नवनाथ जोंधळे, जयेश बोरसे, स्वप्नील कासार, सागर डावरे, यशवंत बेंडकुळे आदींनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.