सिन्नर – पांगरी शिवारात हॉटेल मातोश्री जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत वावी येथील दोन हॉटेल कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. बुधवार सायंकाळी ७ वाजता हा अपघात झाला. या घटनेनंतर वाहनचालक वाहन घेऊन फरार झाला. या अपघाताचे सविस्तर वृत्त असे की, वावी येथील हॉटेल साई श्रद्धा मध्ये गेली पंधरा ते वीस वर्षापासून काम करत असणारे दोघे कर्मचारी मुन्ना छोटाम् अन्सारी वय ४५, आनंदकुमर् चौधरी वय २५ दोघे राहणार औरंगाबाद (बिहार) हे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हॉटेलला सुट्टी असल्या कारणाने सिन्नर वरून पांगरी येथे व पांगरी वरून वावी कडे मोटार सायकलने परतत असताना हा अपघात झाला. पांगरी जवळ हॉटेल मातोश्री जवळ सुसाट वेगाने येणाऱ्या पिकअप मालवाहतूक गाडीने दोघांना चिरडले. त्यानंतर गाडी सुसाट वेगाने सिन्नर च्या दिशेने निघून गेली, गावातील नागरिकांनी त्वरित खासगी रुग्णवाहिकेतून सिन्नर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या दोन्ही कर्मचाऱ्यांचा स्वभाव मनमिळाऊ असल्याने वावी परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे
या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हॉटेल मालक दिवाकर बंगेरा यांनी आज सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर दोघा कामगारांचे मृतदेह अंत्यविधीसाठी बिहार येथे मूळ गावी पाठवून दिले.