सिन्नर – तालुक्यातील घोटेवाडी हे गाव तसे लहान, पण या गावातील दोन बहिणींनी कुस्ती या खेळाच्या जोरावर तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर आपले नाव गाजवत आहेत. मूळचे घोटेवाडी गावचे असलेले कृष्णाजी खामकर यांचे कुटुंब सध्या सिन्नर शहरातील मुक्तेश्वर नगरात स्थायिक आहे. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या कृष्णाजी यांना लहानपणापासूनच कुस्ती करण्याची खूप आवड होती. कृष्णाजी खामकर यांचे वडील देखील कुस्तीपटू असल्याने वारसाने आणि आवडीने कुस्तीचा छंद त्यांना देखील त्यामधूनच लागलेला होता. घरातील परिस्थिती जेमतेम असल्याने कौटुंबिक जबाबदारीमुळे रोजंदारीवर कामावर जावे लागत असल्याने कुस्तीकडे काहीसे दुर्लक्ष झाले होते, परंतु कृष्णाजींच्या आतील पैलवान काही त्यांना शांत बसू देत नसे. आरोग्य हीच आपली श्रीमंती आहे ही खूणगाठ मनात बांधून त्यांनी रोज जोर-बैठका आणि कसरत आदी शारीरिक व्यायाम सुरू ठेवले होते. व्यायामाच्या या छंदामुळे त्यांनी आपले शरीरयष्टी मजबूत केली होती, पण हळूहळू घरातील सर्व जबाबदारी कृष्णाजी वर येऊ लागल्याने मुसळगाव येथील कारखान्यात नाईलाजाने कामाला जावे लागत होते. त्यातून लग्नाचे वय झाले. कृष्णाजी विवाह संस्कारात बांधले गेले. कुस्तीचे स्वप्न थोडे मागे पडले. कौटुंबिक जबाबदारी वाढत गेली.
कालांतराने संसाराच्या वेलीवर दोन कळ्या फुलल्या. मोठी मुलगी आकांक्षा व धाकटी कावेरी या दोघींचा जन्म झाला. स्वतःच्या मुलींचे त्यांनी अगदी लाडाने पालनपोषण केले. मुलींनाच मुलगा मानून त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण भासू दिली नाही. दोघींना नित्यनियमाने व्यायामाची सवय लावली. कृष्णाजी रोज सकाळी तीन तास नित्यनेमाने व्यायाम, कुस्ती मधील डावपेच, इतर सर्व खेळ या सर्व गोष्टी आपल्या दोघी मुलींना शिकवत गेले. प्रामुख्याने स्वतःचे कुस्तीचे मागे पडलेले स्वप्न मुलींच्या माध्यमातून पूर्ण करू या हेतूने त्यांचा कसून सराव घेऊ लागले. त्याच बरोबर कुस्ती साठी लागणारे शारीरिक पौष्टिक आहार आणि खुराक याची देखबाल व्यवस्था सुद्धा केली. त्यांची पत्नीने कल्पना ह्या देखील आपल्या मुली आपल्या पतीचे अपूर्ण राहिलेले स्वप्न मुली पूर्ण करतील या आत्मविश्वासाने त्यांना साथ गेल्या. दोन्ही मुली सक्षम होऊन कुस्तीच्या फडात उतरल्या व मैदानं गाजवू लागल्या. तंत्रशुद्ध कुस्ती आणि त्याअनुषंगाने अभ्यासाचे धडे मविप्र होरायजन अकॅडमी येथे नित्यनेमाने त्यांनी पूर्ण केले.
वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सिन्नर येथून सुमारे तीस किलोमीटर पर्यंत आपल्या मुलींना रोज व्यायाम करीता घेऊन जातात व शारीरिक कसरती करून घेत असतात एवढ्या गोष्टीवरच कृष्णाजी न थांबता अभ्यासाचे धडे सुद्धा न चुकता देत असतात कारण आपण शिकलो नाही तथापि परिस्थितीने आपल्या शिकवल नाही म्हणण्यापेक्षा आपले स्वप्न ही आपल्या मुलीचं पूर्ण करू शकतात या आकांक्षाने तीन तास सराव करून घेत असतात त्यानुसार रात्रंदिवस मेहनत घेऊन आकांक्षा या मोठ्या मुलीने दोन वर्षांपूर्वी जिल्हा विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून आपल्या आई-वडिलांचे नाव उंचीवर नेले.
तेवढ्यावरच न थांबता या दोघी बहिणींनी नुकत्याच भगूर येथील स्वा.नरसिंगराव बलकवडे राष्ट्रीय क्रीडासंकुलात पार पडलेल्या पहिल्या ‘इंडियन ओपन ग्रेपलिंग रेसलिंग चॅम्पियनशिप-२०२१ स्पर्धेत स्पर्धेत विजयी कामगिरी केली. मोठी बहीण आकांक्षा हिने ७२ किलो वजनी गटात सुवर्ण पदक आणि चांदीची गदा पटकावत ‘भारत ग्रेपलर श्री’ हा मान मिळवला आहे. तर धाकटी बहीण कावेरी हिने देखील ६२ किलो वजनी गटात रौप्य पदक (Silver medal) पटकावून सिन्नर तालुकाच नव्हे तर नाशिक जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे.
मुलांपेक्षाही अधिक चांगली कामगिरी
दंगल चित्रपटातील कथेप्रमाणे कृष्णाजी खामकर यांनी मोठ्या जिद्दीने आपल्या दोन्ही मुली आकांक्षा आणि कावेरी यांना घडविले आहे. कुस्तीत दिवसेंदिवस ह्या मुली जे नाव कमावत आहेत त्यामुळे निश्चितच सिन्नरकरांची मान उंचावत आहे. मैदानी स्पर्धेत मुलांप्रमाणेच नव्हे तर मुलांपेक्षाही अधिक चांगली कामगिरी मुली करू शकतात हे सिद्ध करत ह्या दोन्ही बहिणी भविष्यात मुलींना प्रेरणा देणारी कामगिरी दिवसेंदिवस करत राहतील याच त्यांना सर्व सिन्नरकरांच्या वतीने शुभेच्छा आहे.
महेश थोरात, संस्थापक, चैतन्य युवाशक्ती फाउंडेशन, सिन्नर