सिन्नर – सिन्नर तालुक्यातील मलढोन येथे समृद्धी महामार्गालागत रात्री दीडच्या सुमारास वाल्मिक दगडू सरोदे यांच्या वस्तीवर दरोडा घातल्याच्या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. या दरोडयात १० ते १२ जणांची दरोडेखोरांची टोळी होती. सरोदे कुटुंबियांनी दरोडेखोरांचा प्रतिकार केला मात्र त्यांनी घरात घुसून दोन कपाटे उघडून १० ते १२ तोळे सोने लांबविले, महिलांच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले आहे. दरम्यान या दरोडयातली एका दरोडेखोराचा मोबाईल घटनास्थळी सापडला आहे. तर एक संशयित दरोडेखोर ऋषीकेश राठोड वय २५ रा. रुई ता. कोपरगाव हा पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्यावर नाशिक सिव्हिल हॅास्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. या घटनेनंतर सरोदे कुटुंबीय आरडाओरड करत बाजूच्या वस्तीवर मदत मागितली, चोरटे रस्त्यावर पळाले. त्यात एकास नितीन याने गज मारून खाली पाडले, त्याची दुचाकी देखील पडली. त्याला तिघा भावानी पकडून ठेवले. बाकीचे शेतातून व दुचाकीवरून समृद्धी मार्गाने पळाले. या घटनेनंतर डीवायएसपी सोमनाथ तांबे, सागर कोते यांनी पहाटे वस्तीवर भेट दिली. त्यानंतर पोलिसांकडून कसून तपास सुरु केला. गुन्ह्यातील सहभागी पोलिसांच्या रडारवर असल्याचे बोलले जात आहे.