रस्ता रोको आंदोलन मागे घेण्याचे आवाहन- कार्यकारी अभियंता जयंत बोरसे..
सिन्नर – सिन्नर औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांनी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता जयवंत बोरसे यांची भेट घेत वसाहतीतील रस्त्याची झालेली दुरावस्थाचे गांभीर्य पटवून दिल्याने वसाहतीतील रस्त्यांचे दुरुस्तीचे काम लगेच सुरु करण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता बोरसे यांनी दिले.
सिन्नर औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या अनेक पायाभूत सुविधा वसाहत विकसित झाल्यापासून प्रलंबित आहेत. याबाबत वेळोवेळी उद्योजकांकडून एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा व पत्रव्यहार करून सदर पायाभूत समस्यांकडे प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली होती पण त्यात सुधारणा होत नसल्यामुळे व वसाहतीतील मुख्य व अंतर्गत रस्त्याची झालेली दुरावस्था बघता उद्योजकांनी सोमवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी रस्ता रोको आंदोलन करण्याचे पाऊल उचलले. यासाठी वसाहतीतील उद्योजकांनी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता जयवंत बोरसे यांची भेट घेत वसाहतीतील रस्त्याची झालेली दुरुवस्थांची गांभीर्यता पटवून सांगितल्याने तसेच रस्ते दुरुस्तीचे काम तातडीने सुरु न केल्यास येथून पुढे पाणी बिल न भरण्याचा निर्णय घेणार असल्याचे सांगितल्याने व जो पर्यंत रस्त्याचे दर्जेदार काम होत नाही तो पर्यंत सर्व उद्योजक पाणी बिल भरणार नाही व थकलेले बिल वसुलीचा आपणास कोणताही नैतिक अधिकार राहणार नाही याची कल्पना दिल्यानंतर वसाहतीतील रस्त्यांचे दुरुस्तीचे काम सुरु करण्याचे आश्वासन देत रस्ता रोको आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले.
याच बरोबर वसाहतीतील मुख्य रस्त्यांचे नवीन डांबरीकरणाचा प्रस्ताव पाठविण्यात आलेला असून येत्या महिनाभरात त्यास मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याने मुख्य रस्त्याचे डांबरीकरण सुद्धा दर्जेदार स्वरूपात करण्याचा मानस महामंडळाचा असल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर जे ब्लॉक येथील उद्योजकांचा सर्व्हिस रोडच्या कामास लवकरच सुरवात होण्याचे आश्वसन त्यांनी दिले. महामंडळाकडून उद्योजकांच्या पायाभूत समस्या सोडविण्याकरिता नेहमीच प्राधान्य दिले जाते व शासकीय काम असल्यामुळे योग्य प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी पाठवावा लागत असल्यामुळे थोडी दिरंगाई होत असल्याने उद्योजकांनी याबाबत सहकार्य करणे अपेक्षित असल्याचे बोरसे यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी आशिष नहार, सुधीर बडगुजर, अरुण चव्हाणके, किरण वाजे, किरण जैन खाबिया, रतन पडवळ, सचिन कंकरेज, एस के नायर, रवींद्र राठोड आदी उद्योजक उपस्थित होते.