सिन्नर – बंद खात्याचा बनावट चेक देऊन दुकानदाराची ८० हजाराची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिन्नर पोलिस स्थानकात फसवणूकाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अनेक व्यापा-यांना अशा पध्दतीने बनावट चेक दिल्याची माहिती समोर आली असून पोलिस त्याचा तपास घेत आहे. याबाबत समजलेली हकीकत अशी की, पिंपळगाव बसवंत येथील अनिल रमेश कोपरे याने सिन्नरच्या गणेश पेठ मधील श्रीजी इलेक्ट्रॉनिक या दुकानातून मंगळवारी सोनी कंपनीचा ५० हजारांचा एक एल.सी.डी व वीवो कंपनीचा २९ हजार ९९० रुपयांचा मोबाईल खरेदी केला. कोपरे यांनी ही खरेदी केल्यानंतर रोख रक्कम न देता चेक दिला. हा चेक घेऊन दुकानदार अंकुश लहामगे हे बँकेत गेले. पण, त्यांना कोपरे यांचे खातेच बंद असल्याचे समजले. त्यानंतर दुकानदारांनी फोनवर संपर्क करुन कोपरे यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यावेळी त्याने दुकानदाराला मारुन टाकण्याची धमकी दिली. यानंतर दुकानदार लहामगे यांनी सिन्नर पोलिसांत कोपरे याच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.