सिन्नर – सिन्नरकरांचे भूषण, ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचे प्रमुख सेवेकरी, अध्यात्म क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक त्र्यंबक बाबा भगत वय ८९ यांचे आज पहाटे ५ वाजता राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या चार पाच दिवसांपासून ते आजारी होते. दोन दिवसांपासून त्यांची तब्येत अत्यस्वस्थ बनली होती. आज पहाटे भैरवनाथ महाराज मंदिरातील काकड आरती सुरु होत असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, नातू व संपूर्ण महाराष्ट्र भर हजारो भक्तगण असा परिवार आहे. आजच त्यांचा वाढदिवस होता. सिन्नर शहरातील भैरवनाथ मंदिरात श्री हरिनाम सप्ताहाचे त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ४४ वर्षांपासून आयोजन करण्यात येते.तर तळ्यातील भैरवनाथ मंदिरात ६० वर्षांपासून हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. हे दोन्ही धार्मिक सोहळे तालुक्यासह जिल्ह्यातील भक्त गणासाठी पर्वणी मानले जातात. तालुक्यातील प्रत्येक धार्मिक सोहळा त्रंबक बाबा यांच्या शिवाय होतच नव्हता. सकाळची काकड आरती अनेक वर्षांपासून त्यांच्याच नेतृत्वाखाली सुरु झाली. कोविडमुळे दीड वर्षा पासून त्यात खंड पडला होता. भैरवनाथ मंदिर, मोठा गणपती यासह अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांच्याच नेतृत्वाखाली करण्यात आला. थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेने त्यांचा सिन्नर भूषण पुरस्कार देऊन गौरव केला होता. यासह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते.
अध्यात्म क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला; पालकमंत्री छगन भुजबळ
सिन्नर भुषण ह.भ.प. त्र्यंबकबाबा भगत यांचे दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने अध्यात्म क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला असल्याच्या शोकभावना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत. भुजबळ यांनी शोक संदेशात म्हटले आहे की, सिन्नर शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री भैरवनाथ महाराजांचे प्रमुख सेवेकरी असलेले ह.भ.प. त्र्यंबकबाबा भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर शहर व परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत होते. राज्यभरात त्यांचा भक्त परिवार होता. त्यांनी राज्यभर वारकरी संप्रदायाची पताका फडकविली. धार्मिक सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना सिन्नर भुषण पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. त्यांच्या निधनाने राज्यभरातील वारकरी संप्रदायाची कधीही न भरून निघणारी हानी झाली असून अध्यात्म क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक कायमचा हरपला आहे. मी व माझे कुटुंबीय ह.भ.प. त्र्यंबकबाबा भगत यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो असे मंत्री भुजबळ यांनी शोकसंदेशात शेवटी म्हटले आहे.