सिन्नर – सिन्नर तालुक्यातील कणकोरी येथे मांजरीची शिकार करण्याच्या नादात बिबट्या विहिरीत पडला. त्यानंतर रात्रभर बिबट्या आणि मांजरीचा मुक्काम विहिरीत होता. दिवसा मात्र या दोघांना काढण्याचे काम वनविभागाच्या सहाय्याने सुरु झाले. त्यानंतर दिवसभराच्या प्रयत्नानंतर दोघांनाही विहिरीतून बाहेर काढण्यात आले. विशेष म्हणजे बिबट्या व मांजर एकाच विहिरीत असतांना बिबट्याची हाती मांजर आली नाही.
कनकोरी येथील शेतकरी गणेश सांगळे यांच्या मालकीच्या विहिरीत शनिवारी रात्रीच्या वेळी ही घटना घडली. मांजराची शिकार करण्याच्या नादात बिबट्या व मांजर विहिरीत पडले. सकाळी बिबट्याच्या डरकाळ्याचा आवाजाणे परिसरातील शेतकऱ्यांनी सांगळे यांच्या विहिरीकडे धाव घेतली. त्यानंतर विहिरीच्या मधोमध असणाऱ्या कपारीवर बिबट्या दडून बसलेला दिसून आला. तर त्याच्या दुसऱ्या बाजूला मांजर काठावर बसलेली दिसली. यानंतर सांगळे यांनी वनविभागाला तत्काळ याबाबत माहिती दिल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी सकाळी ८ वाजता कनकुरी येथे दाखल झाले.
यावेळी पोलीस प्रशासनालाही बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आले. बिबट्याला बघण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. बिबट्याचा विहिरी बाहेर काढण्यासाठी वनविभागाने विहिरीमध्ये पिंजरा सोडला मात्र, बिबट्याने दुपारी तीन वाजेपर्यंत पिंजऱ्यात येण्याचे धाडस केले नाही. वन विभागाचे १५ ते २० कर्मचारी दिवसभर या ठिकाणी थांबून होते. वन विभागाच्या अथक परिश्रमानंतर विहिरीत पडलेला बिबट्या सायंकाळी पिंजऱ्यात आल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. सदर बिबट्याला सिन्नरमधील मोहदरी उद्यानात हलवण्यात आले आहे.