सिन्नर – पावसाने ओढ दिल्याने पेरणी केलेल्या खरीप पिकांची अवस्था बिकट होत असून पिकांना संजीवनी देण्यासाठी पिण्याचे पाणी वगळता धरणात असलेल्या अतिरिक्त पाण्यातून कडवा कालव्यास आवर्तन सोडण्यासाठीचा प्रस्ताव तात्काळ जलसंपदा मंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्याची मागणी आमदार माणिकराव कोकाटे यांनी केल्याने पाटबंधारे विभागाच्या अधिक्षक अभियंता अलका अहिरराव यांनी प्रस्ताव बनवून मंत्रालयात पाठविला आहे.
यंदा निम्मा पावसाळा संपला तरी सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस पडल्याने खरीप पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत.अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्याही भेडसावण्याची शक्यता आहे.पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे कडवा धरण ८० टक्क्यांहुन अधिक भरले आहे.मात्र आता या परिसरातही पावसाने ओढ दिली आहे.पुढेही पावसाळा असाच कोरडा गेल्यास आवर्तनांचे नियोजन करताना पाटबंधारे विभागाची दमछाक होणार आहे.त्यामुळे पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आल्याने धरणातील आवर्तन सोडण्याचे अधिकार जलसंपदा मंत्र्यांच्या ताब्यात गेले आहे. सिन्नर तालुक्यातील खरीप पिकांची पाण्याअभावी वाट लागत असून लवकरात लवकर कडवास आवर्तन सोडावे व त्यासाठी जलसंपदा मंत्र्यांकडे तत्काळ प्रस्ताव दाखल करावा अशी मागणी आमदार माणिकराव कोकाटे यांनी अभियंता अलका आहिररराव यांच्याकडे केल्याने तसा प्रस्ताव मंत्रालयात पाठविला आहे.यावेळी कार्यकारी अभियंता सागर शिंदे,उपअभियंता बागूल आदी उपस्थित होते.
आवर्तन जास्त दिवसांचे ठेवण्याची मागणी..
कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी १२दिवसांचे आवर्तन सोडण्याचे नियोजन करण्याबाबतची माहिती आमदार कोकाटे यांना दिली असता कोकाटे यांनी एवढ्या कमी दिवसांत शेतकऱ्यांपर्यंत हे पाणी पोहचणार नसून त्यासाठी आवर्तनाचा कालावधी वाढवावा लागेल.शिवाय कडवा धरण ते वडांगळीपर्यंत विशेषतः निफाड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत असून तीही शोधली पाहिजे,अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या.
पालकमंत्र्यांकडेही मागणी..
कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांच्याकडेही आमदार कोकाटे यांनी वर्षभर पिण्यासाठी जेवढे पाणी लागेल तेवढे पाणी धरणात ठेवून उर्वरित जास्तीचे पाणी खरीप पिकांसाठी सोडण्याची मागणी केली.यावर पालकमंत्र्यांनी तसा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येऊन निर्णय घेतला जाईल,असे आश्वासन दिले.
शेतकऱ्यांनी पाणी मागणीचे अर्ज भरावे..
पावसाने ओढ दिल्याने व पुढेही पुरेसा पाऊस न झाल्यास पाणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. शेतकऱ्यांची खरीप पिके वाचविणे गरजेचे आहे.त्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे.धरणात पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त जास्तीचे पाणी आहे,ते कालव्यास सोडण्याची आपण मागणी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पाण्यासाठीची मागणी प्रत्यक्ष दिसण्यासाठी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी कालवा निरीक्षक यांच्याकडे ७ नंबरचे फॉर्म भरून पाणी मागणी करावी.
आमदार माणिकराव कोकाटे