सिन्नर- येथील भिकुसा हायस्कूलमध्ये ऑनलाइन गुरुपौर्णिमा व लोकमान्य टिळक जयंती साजरी करण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून नाशिकच्या बी.वाय.के. कॉलेजचे प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात सर्व मान्यवरांच्या ऑनलाईन उपस्थित व्यास प्रतिमा व लोकमान्य टिळक प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून झाली. त्यानंतर गुरु आदराचे गीत गायन झाले.
डॉ. कुलकर्णी यांनी गुरुपौर्णिमेची माहिती देताना गुरु व शिष्य याचे महत्व पटवून देत विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या गुरुप्रती श्रद्धा ठेवून शिक्षणाचे कार्य आत्मसात करण्याचा संदेश दिला व लोकमान्य टिळकांच्या राष्ट्र प्रेमाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण केली. झापवाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विजय चकोर यांनी विद्यार्थ्यांना गुरुचे महत्व जीवनामध्ये किती अनमोल आहे याविषयी माहिती दिली. लोकमान्य टिळकांनी राष्ट्रभक्तीसाठी कशा पद्धतीने आपले सर्वस्व त्यागले या विषयी माहिती दिली. सदर कार्यक्रमात आपले वक्तृत्व दाखवत ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन गुरुपौर्णिमेविषयी व लोकमान्य टिळकांविषयी सविस्तर भाषणे करीत गुरु प्रेम व्यक्त केले. शाळेचे शिक्षक वैभव चंदे यांनी लोकमान्य टिळकांचे जीवन चरित्र विद्यार्थ्यांसमोर उलगडले व व्यास पौर्णिमे विषयी माहिती देताना गुरु शिष्याची महत्ती गायली.
मुख्याध्यापक सोमनाथ जगदाळे यांनी कोवीडचा प्रादुर्भाव असून सुद्धा आपण आपल्या शाळेमध्ये ऑनलाइन शैक्षणिक व शिक्षणासी निगडीत वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असल्याची माहिती दिली. प्रभाकर बोडके यांनी विद्यालयात कार्यक्रम घेऊन विद्यार्थी कशाप्रकारे आपल्या संस्कृतीची जपणूक करतात याविषयी या विषयी माहिती दिली. जयवंत महाले यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ.कविता बच्छाव,दिलीप पाटील व एकनाथ माळी यांनी परिश्रम घेतले.