सिन्नर: येथील गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात गुरुवर्य मामासाहेब दांडेकर पुण्यस्मरण व गुरुपौर्णिमा कार्यक्रम पार पडला. यावेळी गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रा. अनिल दातार यांनी मामासाहेबांचे जीवन चरित्र उलगडले. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांचे चरित्र दीपस्तंभासारखे आदर्श आहे. आजन्म ब्रह्मचारी राहून संसाराच्या मोहपाशात स्वतःला न अडकवता त्यांनी इतरांचे संसार सुखी कसे होतील याची रात्रंदिवस चिंता बाळगली. विद्यादान, ज्ञानप्रसार व समाजसेवा हेच आपले ध्येय मानून ते अखेरपर्यंत कार्यरत होते. संतांचा धर्म आणि विद्यमान अनुयुगाचे मर्म यांचा समन्वय त्यांच्या विचारात, उक्तीत आणि वृत्तीत आढळतो. आपल्या कृतीतून, त्यागातून आपले मोठेपण त्यांनी सिद्ध केले. त्यांचा आदर्श आजच्या पिढीच्या शिक्षकांनी घेणे काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक हेमंत वाजे म्हणाले, गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांचे सिन्नरला कीर्तनाच्या निमित्ताने येणे व्हायचे. त्यातून ते लोकजागृती करत. लोकांना शिक्षणाचे महत्त्व आपल्या कृतीतून त्यांनी पटवून दिल्याचे ते म्हणाले. प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ यांनी पाहुण्यांचा सत्कार करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यामध्ये आजच्या दिवसाचे महत्त्व सांगून लोकमान्य टिळकांच्या जयंतीचेही स्मरण करून दिले. सूत्रसंचलन प्रा. डॉ. दत्तात्रेय फलके यांनी केले. पाहुण्यांचा परिचय एन.एस.एस. कार्यक्रमाधिकारी प्रा. सुनील कर्डक यांनी करून दिला. आभार प्रा. योगेश भारस्कर यांनी मानले. अनिल दातार यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. उपप्राचार्य आर.व्ही. पवार, डॉ. डी.एम.जाधव, प्रा. चंद्रशेखर बर्वे, प्रा. चिने, अमित बर्वे यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सुरक्षित अंतर ठेवून या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.