सिन्नर – मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास सिन्नर तालुक्यातील वावी येथील मेन रोडवर दुकानासमोर उभी केलेली इको कार MH15 / HM2067 चोरी झाल्याची घटना घडली. चोरीचा सदर प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. वावी येथील भांडी व्यापारी धनंजय दोडे यांच्या मालकीची ही कार होती. रात्री ३ च्या दरम्यान बोलेरो जीप मधून आलेल्या तिघांपैकी एकाने कारच्या मुख्य दरवाजाचे लॉक तोडले. नंतर काही अंतरावर ढकलत नेऊन कार सुरू करून त्यांनी पोबारा केला. हा सर्व प्रकार दोडे यांच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तर चोरीची घटना घडत असताना कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाजही या कुटुंबाला जागवू शकला नाही. तिघाही चोरट्यांनी कानटोपीसह चेहरा झाकला होता. सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. या प्रकाराची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी येत माहिती घेतली. ही कार राखाडी रंगाची असून तिच्या पुढील काचेवर मंगलमुर्ती तर पाठीमागच्या काचेवर श्लोक आणि शौर्य ही नावे लिहिलेली आहेत. चोरट्यांच्या समवेत असलेल्या बोलेरोचा नंबर सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्यात कैद होऊ शकला नाही. परिसरातील सी.सी. टी. व्ही. कॅमेऱ्याचे चित्रीकरण तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.