सिन्नर – येथील भिकुसा हायस्कूलमध्ये सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांच्या उपस्थितीत ऑनलाइन आषाढी एकादशीच कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते दहावीचे पंचवीस विद्यार्थी रांगोळी व वारकरी संप्रदायातील वेशभूषा या स्पर्धेत सहभागी झाले होते. कोरोना महामारीचे संकट सर्वांनाच सतावत असतानाही विद्यार्थ्यांचा उत्साह बघून विद्यालयाचे मुख्याध्यापक सोमनाथ जगदाळे यांनी सर्व स्पर्धकांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिक्षण प्रवाहातून शाळा व शैक्षणिक वातावरणाशी सतत जोडत रहावे व आपली ज्ञान कक्षा रुंदावत ठेवावी असा अनमोल संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर बोडके यांनी करताना एकादशीचे महत्व, एकादशीचा इतिहास, एकादशीची पूजा विधि, पंढरपुरची वैशिष्ट्ये आणि वारकरी संप्रदायाची कार्यपद्धती याविषयी सविस्तर माहिती दिली. स्पर्धकांचे परीक्षण व निरीक्षण शिक्षिका सौ. कविता बच्छाव यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.