सिन्नर- तालुक्यातील ठाणगांव येथील जनसेवा सेवाभावी संस्थेच्या वतीने व अभियंता मुकुंदराव काकड यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील वारकऱ्यांन्ना प्रत्येकी ५ झाडे आषाढी एकादशीचे औचित्य साधत भेट देण्यात आली. कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे वारकरी समुदायाला याही वर्षी पांडुरंगाच्या दर्शनास जाता आले नाही. प्रत्येक वारकऱ्याला जशी पांडूरंगाच्या भेटीची आस असते, तशीच पांडुरंगालाही वारकरी नियमीत यावा, भेटावा असे वाटत असते. तरी वारकरी वर्गाने निराश न होता सकारात्मक उर्जा घेवून रहावे. कारण विठूरायाच आपली परिक्षा घेत असेल व तोच कोरोनाच्या या संकटातून आपणा सर्वांना बाहेर काढेल असा आशावाद जनसेवेचे अध्यक्ष रामदास भोर यांनी व्यक्त केला.
यावेळी बबन दादा काकड, राजेंद्र काकड, सचिन रायजादे,अर्जुन नाना आव्हाड, भगवान शिरसाट, गणेश पाटील शिंदे, अंकुर काळे वसंतराव आव्हाड, अमोल काकड, शंकर आमले व सागर भोर यांच्या हस्ते वारकऱ्यांना वृक्षभेट देण्यात आली. ज्ञानेश्वर भजनी मंडळाचे सदस्य शांताराम शिंदे, पंढरीनाथ शिंदे, चंद्रभान शिंदे, सोमनाथ शिंदे, बाळासाहेब शिंदे, नाना शिंदे, अर्जुन नाना शिंदे, दत्तात्रेय शिंदे यांसह ग्रामस्थ व वारकरी यावेळी उपस्थित होते. जनसेवा संस्थेने केलेल्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमामूळे आषाढी एकादशीच्या दिवशी आम्हा भजनी मंडळाला व वारकर्यान्ना वृक्षरुपी पांडूरंगच भेटला असुन आज सकारात्मक उर्जा मिळाल्याचे भजनी मंडळाचे सदस्य शांताराम शिंदे यांनी सांगितले.*