सिन्नर- तालुक्यातील पंचाळे येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य महेश थोरात यांचा वाढदिवस सालाबादप्रमाणे विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत विधायक कामांनी वाढदिवस साजरा करण्याची दर वर्षाची परंपरा राखत त्यांनी वाढदिवस साजरा केला.
थोरात यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत जमा करून गावातील आदिवासी बांधवांच्या वस्तीसाठी पिण्याच्या पाण्याच्या स्टोरेजची व्यवस्था केली. लोकवर्गणीतून जमा झालेल्या पैश्यातू दोन हजार लिटर्सच्या टाकीचे लोकार्पण माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे सचिव राजेश गडाख यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमासाठी राहुल आणि प्रितेश मालपाणी या भावंडांनी स्वतःच्या बोअरवेलचे पाणी कायमस्वरूपी उपलब्ध करून दिले आहे.
पंचाळे – मेंढी रस्त्याला लाईटची व्यवस्था नसल्याचे समजताच राजेश गडाख यांच्या माध्यमातून तात्काळ ही समस्या सोडवण्यासाठी लाईट उपलब्ध करून देत महेश थोरात यांनी वाढदिवशी आगळेवेगळी भेट देऊन वाढदिवस कार्यक्रम अजून विधायक बनविला. गेल्या अनेक वर्षांपासून थोरात करत असलेल्या अनेक नाविन्यपूर्ण आणि विधायक सामाजिक कामांचे कौतुक करून गावात यापुढे वाढदिवस असेच सामाजिक कार्यक्रमांतून साजरे व्हावे असे मत गडाख यांनी याप्रसंगी मांडले.
यानंतर थोरात यांच्याद्वारे पंचाळे-वंडागळी रस्त्याच्या रहिवाशांना *”एक घर एक झाड”* ह्या संकल्पनेतून आंबा, चिंच, बदाम अशी ३७ फळझाडे देऊन करून वृक्षारोपण करण्यात आले. सर्व कार्यक्रमांसाठी चैतन्य युवाशक्ती फाऊंडेशनचे पदाधिकारी आणि मित्रपरिवार यांचे सहकार्य लाभले.