सिन्नर रुग्णालयात स्वंयमनिर्मित ऑक्सिजन युनिटचे लोकार्पण
सिन्नर : कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी लागणारे रेमडेसिवीर इंजेक्शन असो या ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरोना महामारीच्या काळात अनेक रुग्णांना ऑक्सिजनअभावी आपल्या प्राणाला मुकावे लागत आहे. मात्र खासदार हेमंत गोडसे यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे नाशिक शहरासह नाशिक लोकसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी स्वंयमनिर्मित ऑक्सिजन युनिट उभारण्यात येत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा निश्चितच दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. खा. गोडसे यांच्या प्रयत्नातून रेमडेसिवीर इंजेक्शनचा देखील पुरेसा साठा रुग्णांसाठी उपलब्ध झाला आहे. जिल्हा कोरोनामुक्त होण्यासाठी खासदार गोडसे यांनी केलेले कार्य निश्चितच अभिनंदनीय आणि अनुकरणीय असल्याचे प्रतिपादन माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी येथे केले.
सिन्नर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात बुधवारी (दि.१२) खासदार गोडसे यांच्या प्रयत्नांतून स्वंयमनिर्मित ऑक्सिजन युनिटचे लोकार्पण करण्यात आले. या युनिटच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन माजी आमदार राजाभाऊ वाजे बोलत होते. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात, प्रांताधिकारी पुजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, सिन्नर ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. वर्षा लहाडे यांच्यासह शिवसेना युवानेते उदय सांगळे, सभापती शोभाताई बरके, नगराध्यक्ष किरण डगळे, उपसभापती संग्राम कातकाडे, तालुकाप्रमुख सोमनाथ तुपे, उपजिल्हा प्रमुख दीपक खुळे, शहर प्रमुख गौरव घरटे, पिराजी पवार, बांधकाम व्यावसायिक अभय चोकशी, विजय बाविस्कर, भाऊसाहेब सांगळे, बी.टी. कडलग आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार वाजे पुढे म्हणाले की, खासदार गोडसे यांनी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया नाशिक सेंटर यांच्या सहकार्याने आजवर कोरोना बाधितांवरील उपचाराला गती मिळावी यासाठी अनेक समाजपयोगी कामे केली आहेत. याशिवाय विविध कंपनींच्या सी.एस.आर. फंडातून आणि बिल्डर्स असोशिएशनच्या मदतीने खा. गोडसे यांनी नाशिक, इगतपुरी, सिन्नर, देवळाली आदी ठिकाणी स्वंयमनिर्मित ऑक्सिजन युनिट कार्यान्वित करुन ओॅक्सिजनची पुरेशी उपलब्धता करुन दिली आहे. त्यामुळे खासदार हेमंत गोडसे यांचे कार्य सर्वांसाठीच अभिनंदनीय आणि अनुकरणी असल्याचे गौरोद्गार माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी याप्रसंगी काढले.
सदर युनिट बडोदा येथील Airro (ॲरो) या कंपनीकडून खरेदी करण्यात आले आहे. या युनिटची ऑक्सिजन निमिर्तीची क्षमता प्रतितास १० एन.एम.क्यू. म्हणजे १६० लिटर ऑक्सिजन इतकी आहे. या युनिटमुळे सुमारे ४५ ते ५० रुग्णांना चोवीस तास ऑक्सिजन उपलब्ध होणार असून दिवसभरात सुमारे ४० जम्बो ऑक्सिजन सिलिंडर भरता येणे शक्य आहे. यामुळे ऑक्सिजनअभावी होणारी रुग्णांची गैरसोय दूर होणार असल्याने सिन्नरसह तालुक्यातील आणि पंचक्रोशीतील नागकिरांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
००००००००००००००
अन् खासदार पोहचले कोरोना बाधितांच्या वार्डात
लोकार्पण कार्यक्रमाच्या वेळेआधीच खासदार गोडसे सिन्नर रुग्णालयात दाखल झाले. कोरोना बाधितांचा वार्ड कुठे आहे. याची अधिकारी आणि कार्यकर्त्यांकडे विचारणा करीत खासदार गोडसे थेट कोरोना बाधित रुग्णांच्या वार्डात पोहचले. तिथे जावून खा. गोडसे यांनी वार्डाच्या स्वच्छतेची आणि ऑक्सिजनच्या होत असलेल्या पुरवठ्याची माहिती थेट कोरोनाबाधित रुग्णांकडून जाणून घेतली. खासदार थेट आपल्या संवाद साधत असल्याने कोरोना बाधित रुग्णांना हायसे वाटले. यावेळी खा. गोडसे यांनी वार्डातील रुग्णांची आस्तेवाईक चौकशी केली.
०००००००००००००००००००
कोरोना हद्दपार करण्यास सहकार्य करावे
ऑक्सिजन अभावी रुग्णांना आपल्या प्राणाला मुकावे लागू नये, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. याकामी बिर्ल्डस असोसिएशन ऑफ इंडिया, नाशिक सेंटर या संस्थेचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. या ऑक्सिजन युनिटमुळे तालुक्यातील रुग्णांची गैरसोय दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. आजपासून लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधाचे नागरिकांनी तंतोतत पालन करुन कोरोना हद्दपार करण्यास सहकार्य करावे.
खासदार हेमंत गोडसे, नाशिक