सिन्नर- केंद्र सरकारच्या वतीने सातत्याने सुरु असलेल्या डिझेल- पेट्रोलच्या दरवाढीचा निषेध करण्यासाठी सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने आज( दि.१२) सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. तालुका काँग्रेस कमिटीच्या सांगळे कॉम्प्लेक्समधील कार्यालयापासून रॅलीला प्रारंभ झाला.
केंद्रामधील भारतीय जनता पक्षाच्या मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने लोकांना नको ती खोटी आश्वासने देत, अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सर्वसामान्यांची दिशाभूल वा फसवणूक केली आहे. समाजातील सर्व स्तरातील सर्व घटक शेतकरी, व्यापारी, नोकरदार, संपूर्ण जनतेचीच फसवणूक करून त्यांचे कंबरडे मोडण्याचा घाट जणू मोदी सरकारने घातलेला दिसतो आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले असून त्यांनी शंभरी ओलांडली आहे. त्यातून महागाई वाढली असून सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. सर्वसामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या, त्यांचे कंबरडे मोडणाऱ्या मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. कोरोनाच्या संकटामुळे कमीत कमी कार्यकर्ते, जास्तीत जास्त जनजागृती यावर भर देत, सोशल डिस्टंसिंग, मास्क या सर्व बाबींचा वापर करून ही रॅली शहराच्या सर्व भागात फिरली.
गॅस सिलेंडरचे दरही भरमसाठ वाढल्यामुळे सर्वसामान्य महिला वर्गाचे जगणे मुश्किल झाले आहे. सर्वसामान्याचा घरखर्च वाढला आहे. या सर्व बाबींचा विचार करून पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडरची दरवाढ त्वरीत रद्द करावी अशी मागणी या रॅलीच्यावतीने करण्यात आली. हिंदू-मुस्लिमसह समाजा- समाजामध्ये फूट पाडून सत्ता भोगायची फक्त एवढेच उद्दिष्ट भारतीय जनता पक्षाने ठेवले असून जाती धर्माच्या नावाखाली पाडण्यात येणाऱ्या फुटीचाही यावेळी निषेध करण्यात आला. सांगळे कॉम्प्लेक्स, शिवाजी चौक, नवा पूल, बस स्टँडमार्गे वाजे पेट्रोल पंपावर रॅलीचा समारोप करण्यात आला. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरची भाववाढ रद्द करावी या मागणीचे निवेदन तयार करुन त्यावर 5000 सह्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या सह्या घेऊन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे निवेदन पाठविण्यात येणार आहे.
मोर्चाचे नेतृत्व सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनायक सांगळे, नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश चोथवे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुजाहिद खतीब, तालुका समन्वयक उदय जाधव, तालुका सरचिटणीस भावेश शिंदे, तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष हेमंत क्षीरसागर, तालुका अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष जाकीर भाई शेख, गोपीनाथ झगडे, दामू अण्णा शेळके, शहर काँग्रेस कमिटीच्या महिला अध्यक्ष रत्नमाला मोकळ, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष भाऊसाहेब शेळके यांनी केले. रॅलीत योगिता मोरे, ज्ञानेश्वर लोखंडे, भाऊसाहेब मोकळ, सागर जाधव, शब्बीर भाई सय्यद, ज्ञानेश्वर पवार, बबलू मोमीन, रावसाहेब थोरात, सुरज राऊत, ज्ञानेश्वर पवार, सागर जाधव, विशाल परदेशी, विजय वारुंगसे, बाळासाहेब गोरडे, शिवराम शिंदे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.