सिन्नर- पंचवीस वर्षे लोकप्रतिनिधींचे उंबरे झिजवले. प्रश्न किरकोळ असूनही ते सुटत नव्हते. अखेर माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या माध्यमातून मळहद्दीतील प्रश्न मार्गी लागला. श्रेय कोणीही घेवो, आम्हा नागरिकांना खरे कष्टकरी माहिती असल्याचे मळहद्दीतील ग्रामस्थांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.
मापरवाडी ते तळ्यातील भैरवनाथ हा मार्ग होण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न केले. मात्र, दाद दिली जात नव्हती, असे बाळासाहेब गाडे, दिलीप मुरकुटे या नागरिकांनी सांगितले. रामेश्वर गाडे, गणेश तटाणे, संतोष विघे, रामनाथ तुंगार, शिवाजी काकड, रामदादा काकड, फकीरा हीरे, दशरथ काकड, रामभाऊ गाडे, राहुल गाडे, रवींद्र गाडे, एकनाथ काळे, बाजीराव काळे, विजय उगले, साहेबराव गाडे, नारायण हिरे, खंडू उगले, वसंत उगले आदी उपस्थित होते. राजकारणाचा यात कोणताही संबंध नाही.
या रस्त्याची अनेक वर्षांपासून मागणी होती. मापरवाडी ते तळ्यातील भैरवनाथ रस्ता वाहतूकीसाठी योग्य नव्हता. हा रस्ता होणार असल्याने मळ हद्द परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी हा प्रश्न सोडवल्याने नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.
माजी आमदार वाजे यांनी त्यांच्या कार्यकाळात उगले मळा व हिरे मळा परिसरात दोन वसंत बंधारे बांधुन दिल्याने त्याचा परिसराला चांगला फायदा होत असल्याकडेही पत्रकात लक्ष वेधण्यात आले आहे. उन्हाळ्यातही विहिरींची जलपातळी यंदा टिकून राहिली. या कामाचा फायदा कशातही मोजता येणार नाही. मापरवाडीतील आदिवासी समाजाचे भैरवनाथ मंदिर असून येथे सभामंडप बांधण्यात आला. तळ्यातील भैरवनाथ मंदिर परिसराला पेव्हर ब्लॉकने सुशोभिकरण करण्यात आले. पाच वर्षात अनेक वर्षांपासूनच्या मागण्या पूर्ण झाल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.