सिन्नर- येथील माळेगाव एमआयडीसी मधील एफडीसी लिमिटेड कंपनीतील कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या भाऊसाहेब कातकाडे यांच्या कुटुंबीयांना पन्नास लाखाचा धनादेश नुकताच देण्यात आला. कंपनी व्यवस्थापन आणि सीआयटीयु युनियन तर्फे कायदेशीर बाबीच्या पूर्ततेनंतर कंपनी व्यवस्थापनाचे रमेश जाधव व सिटूचे जिल्हाध्यक्ष सिताराम ठोंबरे यांच्या हस्ते कातकाडे कुटुंबीयांना हा धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी कामगार आणि एफडीसीतील कर्मचारी यांनीदेखील ४१ हजार ५०० रुपयाची मदत सुपूर्द केली.
कोरोनाने मृत पावलेल्या कामगार, सेवकांना व्यवस्थापनाने आर्थिक मदत करण्याची मागणी सीआयटीयु युनियनने केली होती. त्याचा विचार करून व्यवस्थापनाने ही मदत दिली. अन्य कंपन्यांनीही असा पुढाकार घेण्याची मागणी सीआयटीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी केली आहे.
कातकाडे यांच्या मुलास व्यवस्थापनाने कामावर रुजू करून घ्यावे अशीही विनंती यावेळी करण्यात आली. यावेळी सिटूचे सिन्नर तालुका अध्यक्ष हरिभाऊ तांबे, एच. आर. मॅनेजर एन. पी. कुलकर्णी, कमिटी सदस्य एस. एस. मोरे, जी. एफ. आव्हाड उपस्थित होते.