सिन्नर- बदलत्या काळानुसार पोस्ट कार्यालय सुद्धा कात टाकत आहेत. सामान्य माणूस व ग्रामीण भागाची नाळ अजूनही पोस्ट ऑफिसशी जोडली गेलेली आहे. त्याचाच विचार करून नुकताच नांदूर शिंगोटे पोस्ट कार्यालयात आधार अपडेट व वाहन विमा योजनेचा शुभारंभ इंडिया पोस्ट पेमेंट बँक क्षेत्रीय व्यवस्थापक धीरेन बोरीचा, टाटा जनरल इन्सुरन्सचे क्षेत्रीय व्यवस्थापक सागर करवा, नांदूर शिंगोटे पोस्टमास्तर अमोल गवांदे व सहाय्यक पोस्टमास्तर संजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
या सुविधीद्वारे आधारला मोबाईल नंबर तसेच इमेल अपडेट करता येणार आहे. तसेच पोस्ट कार्यालयात दोन चाकी व चार चाकी वाहनांचा विमासुद्धा काढता येणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या सहाय्याने ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. सध्या टाटा जनरल इन्सुरन्स व बजाज अलायंझ या कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. पोस्टमन त्यांना दिलेल्या स्मार्टफोनच्या आधारे तात्काळ व्यक्तीचे आधार कार्ड व वाहन विमा उतरवणार आहेत. या सुविधेमुळे नागरिकांची ससेहोलपट थांबणार असून त्यांना या सुविधेसाठी तालुक्याच्या ठिकाणी न जाता आपल्या गावातच ही सुविधा मिळणार आहे.
नाशिक विभागात सध्या ही सुविधा नांदूर शिंगोटे पोस्ट कार्यालयात व त्या अंतर्गत येणाऱ्या नऊ शाखा डाकघरांमध्ये सुरु करण्यात आली असून टप्याटप्याने पूर्ण नाशिक विभागात कार्यान्वित केली जाणार आहे. या सुविधेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पोस्टमास्तर अमोल गवांदे यांनी यावेळी केले. या कार्याक्रमास मदन परदेशी, तरन्नुम शेख, शिवनाथ सुर्यवंशी, शरद गोराणे, विजय तांबे, लहानू जगताप, सोमनाथ उगले, कमलेश वाळूंज, विलास गवारे व दामोदर ननावरे आदी उपस्थित होते.
……
या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा
नाशिक विभागात ही सुविधा सध्या नांदूर शिंगोटे पोस्ट ऑफिस व त्यांतर्गत येणाऱ्या ०९ शाखा डाकघरांमध्ये सुरु केलेली आहे व लवकरच नाशिक विभागातील ५९ उपकार्यालये व २५९ शाखा कार्यालयांतही कार्यान्वित केली जाणार आहे. सर्व नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
मोहन अहिरराव, प्रवर डाक अधीक्षक, नाशिक मंडळ